भाजपा पदाधिकार्यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा
जालना । वार्ताहर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गायीच्या दुधाला 10 रु लिटर अनुदान व दुध पावडरला 50 रु अनुदान देण्यात यावे तसेच सहकारी दुध संघाकडून दुध कमी भावाने खरेदी केल्यास 1 ऑगस्टला भाजपा रयत क्रांती संघटना, रासप, रिपाई महायुतीच्या वतीने दुध एल्गार आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्ङ्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसभापती भास्करराव पाटील दानवे, भाजपा शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, रा.स.प.चे मराठवाडा सचिव ओमप्रकाश चित्तळकर, भाजपा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब कोलते, विष्णू डोंगरे, कैलास कोळेकर, सरपंच अनिल म्हस्के आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामधील शेतकर्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे.
बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकर्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकर्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 40 लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते. त्यापैकी 35 लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. 90 लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. 15 लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे ङ्गक्त 1 लाख लिटर दुध खरेदी केले जाते. या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध 15 ते 16 रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात 7 लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकर्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वार्यावर सोडले आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो 50 रु अनुदान, शासनाकडून 30 रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे भाजपा पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी जालना यांना दिला आहे.
Leave a comment