कोरोनाला हरविण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करा- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना । वार्ताहर
शहरातील विनिर्देशित केलेल्या कंटेंटमेंट झोनमध्ये फक्त आवश्यक बाबी संदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाणा - येण्यास पुर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे. दि. 29 जुन 2020 रोजीचेच आदेश कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कळविले आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल सर्व नागरीकांचे, लोकप्रतिनिधींचे सामाजिक सेवाभावी संस्थांच्या तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींचे प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की, उद्या दि. 20 जुलै पासुन अनुज्ञेय आस्थापना व दुकाने खुली होणार आहेत. असे असले तरी कोरोनाचे संकट अजुन टळलेले नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये. गर्दी व गर्दीचे ठिकाण टाळावेत. बाहेर पडणे आवश्यक असल्यास मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. कोरोना साखळी जर तोडायाची असेल तर आपल्याला सर्वांना स्वयंशिस्त बाळगण्याची खुप गरज आहे. विशेषत: लहान मुले व वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक यांनी घराबाहेर पडू नये. कुणाला सर्दी, खोकला, ताप, दम लागणे इत्यादी लक्षणे दिसुन आल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे. आपण आपल्या स्वत:च्या आरोग्याची आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची आहे. कमीत कमी वेळा घरांतुन बाहेर पडा, बाजारात विनाकारण गर्दी करु नका, मास्कचा वापर करा, साबण,सॅनिटायझर नियमित वापरा, दो गज की दुरी चे पालन करा.
दुकानदार बंधु,भगिनींना आवाहन
दुकानदार बंधु ,भगिनींना आवाहन आपण देखील प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे पालन करा. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियम तोडणा-या व्यक्तींविरुध्द दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. तरी आपण सर्वांनी योग्य, ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवेला बळी पडु नका. प्रशासनास आणि आरोग्य यंत्रणेला संपुर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.
Leave a comment