खिरापत वाटल्यासारख्या टु- व्हीलर गाड्यांना कर्ज देणार्यांचा असली चेहरा उघड!
जालना । वार्ताहर
एक चेक नाही तर सातबारा द्या अन् टु- व्हीलर गाडी घेऊन जा, अशी जाहिरात बाजी करुन खिरापत वाटल्यासारखे कर्जाऊ गाड्या वाटप करणार्या फायनान्सर कंपन्यांनी लॉकडाऊनमध्ये खरेदीदारांना हप्ते वसूलीसाठी चक्क कारवाई करण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. जालन्यात सध्या लॉकडाऊन आहे, बँका बंद आहेत, असे सांगितल्यानंतरही या कंपन्यांचे कर्मचारी सातत्याने फोन करुन कर्जधारकांना परेशान करत आहेत.
जानेवारी- फेब्रुवारी 2020 पूर्वी अनेकांनी गरजेपोटी फायन्सार कंपन्यांकडून दोन चाकी गाड्या खरेदी केल्या मात्र मार्च महिन्यात केंद्र सरकार लॉकडाऊन घोषीत केले. तर त्यानंतर राज्य सरकारनेही त्यात उडी घेतली. आता केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊनपासून चार हात दूर असले तरी त्यांच्याच अधिपत्याखालील जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु केले आहे. या कालावधीत बँका बंद असल्यामुळे अनेकांचे चेक बाऊन्स झाले आहेत. चेक न वटल्यामुळे फायनान्स कंपन्यांनी तगादा सुरु केला असून वस्तुस्थिती कथन केल्यानंतरही फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. दिवसभरातून वेगवेगळ्या कर्मचार्यांचे फोन सारखे सुरुच असतात. त्यामुळे फायानान्स कंपन्यांच्या या जाचाला कंटाळून उद्या काही विपरित घडले तर त्याची जबाबदारी कोणाची? असा एक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये माध्यम प्रतिनिधी, आरोग्याच्या निगडीत अत्यावश्यक सेवा सोडल्यातर कुणीही रस्त्यावर फिरु शकत नाही, मग फायनान्स कंपन्यांचे वसूलीवाले कसे फिरु शकतात? तुम उसकी चिंता मत करो, वो हम देख लेगें! अशी उर्मट आणि दादागिरीची भाषा ऐकून घेण्याची वेळ दुचाकी घेण्यासाठी कर्ज घेणार्यांवर आली आहे.
Leave a comment