186 महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी दाखल 

जालना । वार्ताहर

कोविड 19 व लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या 186 महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांचा परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या अल अदिल ट्रेडिंग कंपनीने उचलला आहे. अडचणीत सापडलेल्या अधिकाधिक गरजू देशबांधवांना स्वखर्चाने मायदेशी सुखरुप पाठवण्याचा निर्धार डॉ. दातार यांनी केला असून हे मदतकार्य यापुढेही सुरू राहणार आहे.

दुबईतील लॉकडाऊन संपल्यावर अमिरातीतून भारतापर्यंत विमान वाहतूक पूर्ववत झाली. मात्र दुबई ते मुंबईदरम्यानची उड्डाणे अगदी अलिकडेच सुरू झाली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले जवळपास 6 लाख 50 हजार लोक दुबईत अडकून पडले आहेत. त्यामध्ये रोजगारवंचित झालेल्या व पैशाअभावी निवारा गमावलेल्या कामगारांची संख्या ही मोठी आहे.मसलाकिंग डॉ. संजय दातार यांच्या अल अदील कंपनीने सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून अशा गरजू भारतीयांना स्वखर्चाने मायदेशी पोचवण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात हजारो कुटूंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले होते. संकटग्रस्त भारतीयांची घरी लवकर परतण्याची ओढ लक्षात घेऊन डॉ. दातार यांनी निर्धन कामगारांचा विमान तिकीटाचा, तसेच वैद्यकीय चाचणीचा खर्च उचलण्याचे ठरवले. केरळ, तमीळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील 3000 हून अधिक गरजू बांधवांना भारतात घरी सुखरुप पोचण्यासाठी मदत केली. त्यासाठी 3 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला. मोफत विमान तिकीट देताना खऱोखर गरजूंची निवड करण्याचे आव्हान आमच्यापुढे उभे होते. त्याबरोबर इतर ही काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे होते. मराठी कामगारांना सुखरुप घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळवणे, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे, दुबईतील भारतीय कॉन्सुलेटशी समन्वय राखणे, अमिरात व भारत या दोन्ही देशांच्या कायद्याची चौकट पाळणे, चार्टर्ड फ्लाईटसाठी विमान कंपनीशी संपर्कात राहणे आदींचा त्यात समावेश होता. प्रवास व वैद्यकीय खर्चाबरोबरच प्रवाशांच्या होम क्वारंटाइनची जबाबदारी ही उचलायची होती. अल अदील कंपनीच्या वतीने संचालक सौ. वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार यांनी आणि प्रवाशांच्या प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या धनश्री पाटील यांनी समन्वयाचे, प्रवासी निवडीचे काम केले. परवाने विषयक औपचारिकता पूर्ण करण्यात राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रॅव्हल्सचे सुलेमान यांची मदत झाली. रोजगारवंचित कामगारां पैकी ज्यांचे मासिक वेतन 2000 दिर्‍हॅमपेक्षा कमी होते अशा 2000 व्यक्तींची यादी करुन त्यातून 186 मराठी कामगारांची निवड करण्यात आली. हे कामगार संपूर्ण महाराष्ट्रभरातील आहेत. ज्या गरजूंना या अर्थसाह्याची गरज आहे त्यांनी स्वतः किंवा भारतातील नातलगांमार्फत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. संजय दातार यांनी केले आहे.

चौकट

आपल्या बांधवांच्या हालअपेष्टा ऐकून मी हेलावून गेलो. नोकर्‍या गेल्याने अनेकांच्या खिशात काहीच पैसे नव्हते. राहत्या जागेचे भाडे भरण्याची स्थिती नसल्याने अनेकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता. काहींच्या भारतात राहणार्‍या कुटूंबातील आई अथवा वडिलांसारखे ज्येष्ठ सदस्य साथीला बळी पडले होते तर काहींचे जवळचे नातलग रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. घरातील सदस्य क्वारंटाईन झाल्याने लहान मुलांचे हाल होत होते. या स्थितीत आपण परदेशात अडकून पडल्याच्या भावनेतून हे लोक घरी परतण्यासाठी व्याकुळ झाले होते. कुटूंबाच्या काळजीने व ओढीने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांची पहिली तुकडी आता सुखरुप घरी परतली आहे. प्रियजनांना भेटून त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला असेल, याचेच मला समाधान आहे. (मसाला किंग डॉ.संजय दातार,चेअरमन,अलआदिल कंपनी)

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.