जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी
जालना । वार्ताहर
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हिड -19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2 ,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना त्याचे कार्यक्षेत्रात कोव्हिड -19 वर नियंत्रणआणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहेत. कोव्हिड -19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. शासनाने संपुर्ण राज्यात लॉकडाऊन दि 31 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच लॉकडाऊन मधील निर्बंधाची सुलभता आणि लॉकडाऊन टप्प्यानिहाय उघडणे बाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत त्या आदेशान्वये सुचना जालना जिल्ह्यात लागु करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जालना शहरांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींशी झालेल्या विचारविनिमियानुसार 20 जुलै, 2020 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, तहसिलदार भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालना शहरात कोरोना कोव्हिड -19 विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा प्रसार थांबविण्यासाठी जालना शहराचे नगर परिषद जालना हद्दीतील संचारबंदी पुढे वाढविण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधीत तरतुदी अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना रवींद्र बिनवडे यांनी आदेशात बदल करुन संपुर्ण जालना नगर परिषद हद्दीत औद्योगिक वसाहत क्षेत्र वगळुन दि. 15 जुलै 2020 च्या मध्यरात्री 12.00वाजेपासुन ते दि. 20 जुलै 2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत संचारबंदी (लॉकडाऊन) लागु केले आहे. या कालावधीत नागरीकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. आदेशात नमुद सर्व निर्देश यापुर्वीच्या आदेशात वरील कालावधीसाठी लागु राहतील. आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडुन या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी दिले.
Leave a comment