जालना । वार्ताहर
जालना शहरात संचारबंदी लागू होताच जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नगरसेविका सौ.स्वातीताई सतीश जाधव व नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई अशोकराव लहाने यांच्या पुढाकाराने चंदनझिरा परिसरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीस प्रारंभ करण्यात आला असून शंभर कुटूंबातील सदस्यांची तपासणी करण्यात आली. अशी माहिती नगरसेविका सौ.स्वाती जाधव यांनी मंगळवारी (ता 07) दिली. जालना शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून दिवसेंदिवस रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलत शहरात कालपासून संचारबंदी लागू केली.
तथापि तीन दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने संचारबंदी च्या पहिल्या दिवसापासून नगरसेविका सौ.स्वाती जाधव यांनी सहकारी नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई लहाने, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष दराडे, रेखा निर्मल, पर्यवेक्षिका पल्लवी जोशी, अश्विनी कांबळे, अंगणवाडी सेविका लक्ष्मी वखरे, लीला भुसारे, कविता इंगोले, रेणुका जाधव, शिक्षीका सुनिता पेडगावकर,ज्योती आचार्य, नजमोद्दीन शेख, रझियाबानो शेख, आशा स्वयंसेविका संगीता दणके, देवकी पठारे, सीमा मुखदल, गीता भालेराव, अनिता कवडे यांना सोबत घेऊन घरोघरी जात शरीर तापमापक यंत्राद्वारे प्रत्येक सदस्यांची तपासणी केली. कोरोना संसर्गा विषयी माहिती देऊन संसर्गा पासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी हात धुणे, सॅनिटाइजर व मास्क वापरणे, वृध्द, गरोदर माता, लहान बालके यांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी या विषयी प्रबोधन करण्यात आले. संपूर्ण प्रभागात आगामी आठ दिवस सदर मोहीम राबविली जाणार असून संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर न पडता सहकार्य करावे असे आवाहन नगरसेविका व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या मोहिमेत प्रभागातील रहिवाशांनी सहभागी होत सहकार्य केले.
मास्क व सॅनिटाइजरचे मोफत वाटप-सौ.स्वाती जाधव
परदेशातून परतलेला एक व्यक्ती सोडला तर कोरोना संसर्गापासून चंदनझिरा परिसर सुरक्षित आहे. मात्र निर्धास्त न राहता खबरदारी म्हणून तसेच सर्व सामान्य कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्याचा काळजीसाठी चंदनझिरा व नागेवाडी भागात एक हजार सॅनिटाइजर बॉटल आणि येथील महिलांनी तयार केलेले दहा हजार मास्कचे मोफत वाटप केले जाणार आहे. असे नगरसेविका सौ.स्वाती जाधव व लक्ष्मीबाई लहाने यांनी सांगितले. दरम्यान या परिसरातील रहिवासी कामगारांचीही तपासणी केली जाईल असे ही त्यांनी नमूद केले.
Leave a comment