माजी मंत्री लोणीकर यांची मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
मंठा । वार्ताहर
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन चे बोगस बियाणे शेतकर्यांना वाटप केले गेल्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे भयानक संकट उभे राहिले असून त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे नामांकित कंपनीचे आणि महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाचे बियाणे शेतकर्यांनी मोठ्या विश्वासाने विकत घेतले होते परंतु या दोघांनीही विक्री केलेले बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे बियाणे महामंडळ आणि बोगस बियाणे विक्री करणार्या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व नुकसानग्रस्त शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रतिहेक्टरी आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे
दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकर्यांसमोर उभे राहिले असताना देखील शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय झाल्याचे निदर्शनास येत नाही दुबार पेरणीचा कालावधी देखील पूर्णतः संपला आहे तरी देखील आपल्या मंत्रिमंडळातील कृषीमंत्री यांनी ज्या शेतकर्यांचे सोयाबीन उगवले नाही त्या शेतकर्यांचे पंचनामे करून त्यांना पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र कृषिमंत्र्यांच्या या आदेशाला बियाणे कंपन्या आणि महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाले आहे असेही लोणीकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. शेतकर्यांनी शासनाकडून दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे मिळणार या आशेपोटी अनेक दिवस पेरणी थांबलेली होती प्रत्यक्षात मात्र बियाणे न मिळाल्यामुळे खासगी सावकारांकडे जाऊन कर्ज घेऊन दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे अत्यंत गंभीर बाब असल्याचे लोणीकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात माधव दगडोबा कदम या शेतकर्याने यशोदा हायब्रीड सीड्स वर्धा आणि इगल सीड्स कंपनी इंदोर यांच्याकडून सोयाबीनचे जेएस 335 हे वाण खरेदी केले होते 16 जून ते 18 जून दरम्यान पेरणी देखील केली होती एकरी 30 किलो बियाणे कदम यांना पेरणीसाठी लागले होते बियाण्याची पेरणी पंचनामा प्रमाणे 4 ते 5 सेंटीमीटर खोली वरच होती 70 टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे पैकी केवळ 9 टक्के बियाण्याची उगवण झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत फसवणूक करणार्या या या दोन्ही कंपन्यांविरोधात भादवि कलम 420, 34 यासह बियाणे कायदा 1966 कलम 6 बी, 7 बी बियाणे नियम 1968 कलम 23 (2) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे कायदा सर्वांना सारखा आहे त्यामुळे भा द वि 420 अंतर्गत ज्या संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या संबंधितांना अटक करण्यात यावी अशी विनंती देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
अनेक ठिकाणी शेतकरी स्वतः फसवणूक करणार्या कंपन्या आणि बियाणे महामंडळ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील दि. 26 जून 2020 रोजी दिलेल्या निर्णयात शेतकर्यांनी तक्रार देऊनही कारवाई करत नसतील तर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले आहेत. ज्या कंपन्यांनी आणि बियाणे महामंडळाने शेतकर्यांची फसवणूक केली त्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रतिहेक्टर 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
Leave a comment