जालना । वार्ताहर
अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि सदर बाजार पोलिसांनी मागील काही महिन्या पूर्वी जप्त केलेला 7 लाख 29 हजार रुपयांचा अवैध गुटखा अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात जाळून नष्ट केला आहे.
सदर बाजार पोलिसांनी 6 ऑक्टोबर 2019 रोजी जालना शहरात अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा बोलेरो पिकअप ( क्र. एमएच-21, एक्स- 974) पकडला होता. यावेळी 5 लाख 18 हजर 400 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता. तसेच,दि. 19 नोव्हेंबर 2019 रोजी सदर बाजार पोलिसांनी भोकरदन नाका परिसरात अवैध गुटख्याची वाहतूक करताना लोडींग रिक्षा क्र. एमएच- 21, एजी- 1330 पकडला होता. यावेळी 2 लाख 11 हजार 200 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षक वर्ष रोडे यांच्या फिर्यादीवरून वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते,दरम्यान, या दोन्ही गुन्ह्यातील सुमारे 7 लाख 29 हजार 600 रुपये किमतीचा अवैध गुटखा आज दि 6 रोजी अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील संजय कॉटन सीड्स इंडस्ट्रीजच्या आवारातील मोकळ्या जागेत एकत्र करून पंचासमक्ष जाळण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, पोलीस कर्मचारी विनोद उरफाटे, सुनील म्हस्के, सुधीर वाघमारे, स्वप्नील साठेवाड, योगेश पठाडे, सोपान क्षीरसागर, बाबा गायकवाड यांच्यासह पंच उपस्थित होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुहे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Leave a comment