जालना । वार्ताहर
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून अंबडचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड.विलासबापू खरात यांची निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची नुतन प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. त्यात अॅड. खरात यांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल अॅड. खरात यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र ङ्गडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब पा. दानवे, आ. बबनराव लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष पा. दानवे आदींचे आभार मानले आहेत.
अॅड. विलास खरात हे गेली अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असून आमदार म्हणून त्यांचे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अत्यंत चांगली अशी कामगिरी राहिलेली आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद घेऊन अॅड. विलासबापू खरात यांना आजही जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. आमदारकीबरोबरच त्यांनी सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातही भरीव असे योगदान दिलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, मत्स्योदरी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष, ओमशांती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी यशस्वीपणे कार्य केलेले आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी घनसावंगी विधानसभेची उमेदवारी दिली होती. अॅड.खरात यांनी भाजपा पक्ष वाढीसाठी अटोकाट प्रयत्न करुन त्यांनी पक्षहित समोर ठेऊन विविध प्रकारचे मेळावे घेतलेले आहेत. याशिवाय बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी रोजगार मेळाव्याचेही आयोजन केले आहे. अॅड. विलासबापू खरात यांचे कार्य आणि वाढता जनसंपर्क लक्षात घेऊन भाजपाने त्यांची प्रदेश कार्यकारिणीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल अॅड. खरात यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment