उद्या मध्यरात्रीपासून जालनाही लॉकडाऊन
जालना । वार्ताहर
गेल्या महिनाभरात जालना शहरात आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णाचा आलेख सारखा वाढत असल्याने आणि समुहसंसर्गाचा धोका निर्माण झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने उद्या शनिवारी मध्यरात्रीपासून जालना शहरामध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी आमदार कैलास गोरंटयाल,जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, मुख्याधिकारी नार्वेकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर घेण्यात आला आहे. जालन्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने किमान जालना शहरात लॉक डाऊन करावे अशी अपेक्षा जालना शहरातील व्यापारी,व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि सामान्य लोकांमधून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बेठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनातर्फे आजच तातडीने जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाचे नवे तीस रूग्ण
रूग्णसंख्या पोहचली साडेसहाशेच्यावर
जालना जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळी 30 नवीन कोरोना बाधित रूग्णांची भर पडली असून त्यात 19 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 650 वर पोहचली आहे.जालना जिल्हा रुग्णालयातर्फे काल गुरुवारी जवळपास दीडशे संशयीत रुग्णांचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही अहवाल आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले असून त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत
Leave a comment