जालना । वार्ताहर
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकर्यांनी विविध सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन शेती शाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ असून विना खर्च आणि घरच्या घरी बनवण्याची पद्धत व ङ्गायदे याची माहिती देऊन हुमनी आळीचे भुंगेरे गोळा करून नष्ट करण्यासाठी आवाहन श्री. पुंड यांनी यावेळी शेतकर्यांना केले.
प्रयोगशील शेतकरी निवृत्ती घुले यांच्या शेतात कापूस व मूग या पिकाच्या शेती शाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आंतरपीक पद्धती, मिश्र पिके, सापळा पिके व माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित शेतकर्यांचे शंकासमाधान करण्यात आले. शेतीशाळा प्रशिक्षक मुकुंद ढवळे यांनी निंबोळी गोळा करण्याचे आवाहन करून उपस्थितांना कोविड-19 बद्दल घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक चंदा चव्हाण यांनी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त झालेल्या कामाची माहिती देऊन विहीर पुनर्भरण करण्यासाठी शेतकर्यांची निवड केली. समूह सहाय्यक विष्णू डोंगरे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीची कार्य व विविध घटकांची माहिती उपस्थितांना दिली. तर प्रयोगशील शेतकरी निवृत्ती घुले यांनी कापूस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, करून उत्पादन खर्च कसा कमी होतो हे पटवून दिले त्यासोबत स्वयंप्रेरित हवामान यंत्र याचे प्रात्यक्षिक व सूत्रकृमी यांची जोपासना करण्यासाठी झेंडूची रोपे एरंडीची रोपे शेतामध्ये लावणी याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकर्यांना करून दाखवण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषी संजीवनी समितीचे अध्यक्ष, सदस्य, कृषी मित्र, कृषी ताई व गावातील पुरुष व महिला शेतकर्यांची उपस्थिती होती.
Leave a comment