वॉर्ड क्रमांक 7 मध्ये पहिल्याच पावसाने रस्ता झाला चिखलमय
नगरसेवकांचे आश्वासने गेली वाहत
बदनापूर । वार्ताहर
नगर पंचायत अस्तित्वात येऊन पाच वर्षे उलटल्यानंतर व विकासाच्या मोठमोठी आमिषे दाखवलेल्या बदनापूर येथील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली असून येथील गणेश नगर भागात रस्तयात प्रचंड चिखल होऊन चिखलामुळे घरात जाता येत नाही तसेच पाण्याचा योग्य निचरा करण्यात न आल्यामुळे काही घरात पाणी शिरल्याचीही घटना घडत आहेत. या वॉर्डात कोणर्याही मूलभूत सुविधा देत नसल्याने साधे पिण्याचे पाणीही या भागात नगर पंचायत पोहोचवू शकलेलीनाही. बदनापूर शहरात नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर विकास होईल असे नागरिकांना वाटत होते. पाच वर्षापूर्वी नगर पंचायत अस्त्विात आली. मोठया प्रमाणात शासनाकडून व नगर विकास खात्याकडून विकास निधीही प्राप्त झाला. त्या निधीतून शहरात मोठया प्रमाणात नाल्या, सिमेंट रस्ते व अंतर्गत ड्रेनेजचे कामे पूर्ण झाल्याचा दावा नगर पंचायतकडून करण्यात येतो. असे असले तरी ही विकास कामे म्हणजे वरवरची मलमपटटी असल्याचेच दिसून येते. सिमेंट रस्ते बनवताना कोणत्याही प्रकारचा विचार न करता शहरातील रस्ते बनवण्यात आल्याने व वॉर्डानुसार रस्ते बनल्याने प्रत्येक वॉर्डात खाली वर हे रस्ते आहेत तशीच अवस्था ड्रेनेज लाईनचीही आहे. त्यामुळे गल्ल्यात साचणारे पाणी वाहत नसून तुंबून बसते.
तसेच ड्रेनेजमधील पाण्याचाही निचरा व्यवस्थीत होत नाही. बदनापूर परिसरात 10 जूनपासून पाऊसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात वॉर्ड क्रमांक 7 मधील गणेश नगर या भागातील रस्त्यावर प्रचंड चिखल होऊन या भागात जाण्याचा रस्ताच बंद झाला. तसेच या परिसरात राहणारे काही घरात पाणी शिरले. गणेशनगर हा भाग बदनापूर शहरातील मुख्य वसाहत म्हणून ओळखला जात असून या भागात सर्व मध्यमवर्गीय व उच्च् मध्यमवर्गीयांचा समावेश असताना या भागात पहिल्याच पावसाने बकाल अवस्था केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे या भागात वर्षभरातून दहा ते पंधरा वेळेसच पिण्याचे पाणी आल्याचेही या ठिकाणच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकत्रित होऊन लढा देणार : संचेती गणेशनगर हा भाग नगर पंचायत क्षेत्रात येत असूनही व नगर पंचायतने मागील दोन ते तीन वर्षात जवळपास 22 कोटी रुपयांचे विकासाची कामे केल्याचा दावा करण्यात येत असताना या ठिकाणी कोणतीही कामे झालेली नाही, साधे पिण्याचे पाणी नगर पंचायत उपलब्ध करून देऊ शकली नाही या बाबत कित्येकदा नगर पंचायतकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी येथे काम करू देत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गणेश नगर भागातील सर्वांनी एकत्रित येऊन थेट जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले आहे. या भागात चालणेही कठीण असताना नगर पंचायत या कडे का दुर्लक्ष करते हे समजत नसल्याने आता या भागातील सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणार असल्याचा निर्धार या भागातील नागरिक अशोक संचेती यांनी केला आहे. जुनी वसाहत असतानाही नपचे दुर्लक्ष : चव्हाण गणेशनगर ही जुनी वसाहत असून या वसाहतीच्या विकासाकडे नगर पंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपच या भागातील गणेश चव्हाण यांनी केला. आम्ही या भागातील रहिवाशी नगर पंचायतकडे मागणीही करूनही आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते पहिल्याच पावसात या जुनया वसातहीची प्रचंड दूरवस्था झालेली आहे. रस्त्याने चालता न येण्यासारखी परिस्थिती झालेली असून गणेशनगर परिसर बेहाल झाला असून लवकरात लवकर या ठिकाणी सुविधा द्याव्या नसता या परिसरातील नागरिकांना घेऊन आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशाराच त्यांनी दिला.
Leave a comment