भोकरदन । वार्ताहर
कोरोना संदर्भात प्रकाशित करण्यात आलेली बातमी चुकीची असल्याचे सांगत औरंगाबाद येथे एका वृत्तपत्राचे संपादक, प्रकाशक व पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा म्हणजे वृत्तपत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असून, शासनाने तात्काळ हे सर्व गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या विषयी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष फकिरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना सोशल डिस्टनसिंग पाळून निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दै.दिव्यमराठी औरंगाबाद विभागीय आवृत्ती मध्ये दिनांक 24 जून रोजी ’ 206 नागरिकांचे मारेकरी कोण ?? ’ आणि नापासांची फौज : निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले ? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या बातम्या चुकिच्या असल्याचं कारण सांगत दिव्यमराठीचे संपादक, प्रकाशक आणि संबंधित वार्ताहराच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या बातम्यांमुळे लोकसेवकांच्या मनावर परिणाम झाला असुन महामारी विरूद्ध चालु असलेल्या उपाययोजनांच्या काळात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी दिव्यमराठी वर ठेवला आहे. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे म्हणजे प्रसारमाध्यमांची गळचेपी आहे, याचा तिव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला असून, सदरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दीपक सोळंके, सचिव सुरेश बनकर, कार्याध्यक्ष सांडू पा.नामदे, यांच्यासह जेष्ठ पत्रकार विजय सोनवणे, रविंद्र देशपांडे, गणेश औटी, महेश देशपांडे, सुनील जाधव, तुषार पाटील, संजय पैठणकर, नानासाहेब वानखेडे, रितेश देशपांडे, इम्रान खान, शेख इरफान, वैभव सोनवणे, कमलकिशोर जोगदंडे, युवराज पगारे, जुल्फेकार मिर्झा, सलीम शेख, रमेश इंगळे, सुरेश गिराम, शेख अन्सार, प्रताप शेळके, विजय पगारे स्वाक्षरी आहे.
Leave a comment