बदनापूर । वार्ताहर
राजूर ते पैठण हा तीर्थक्षेत्रातंर्गत बनवण्यात आलेल्या रोडच्या नानेगाव येथील लहुकी नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असतानाच बनवण्यात आलेला तात्पुरता रस्ता तीन दिवसात दोनदा वाहून गेल्याने या भागातील गावकर्यांचा संपर्क तुटला आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने हा रस्ता वाहून गेलेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात नळया टाकून डागडुजी करून हा रस्ता बनवण्यात आलेला असताना शुक्रवारी रात्री नदीच्या वरच्या भागात पाऊस झाल्याने पुन्हा आलेल्या पाण्याने हा रस्ता शुक्रवारी रात्री वाहिल्यामुळे शनिवारी सकाळी या भागातील वाहतुकीला पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात गुरुवारच्या पहाटे अतिवृष्टी होऊन मा प्रमाणात हानी झालेली होती. राजूर ते पैठण हा तीर्थक्षेत्रांतर्गत रस्ता निर्माणाधिन असून रस्त्याचे काम संपूर्ण झालेले असले तरी पुलांचे काम मात्र रेंगाळलेले आहे. या रस्त्यावरच नानेगाव येथील लहुकी नदीवर पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी कच्चा तात्पुरता वळण रस्ता बनवण्यात आलेला आहे.
गुरुवारच्या अतिवृष्टीत हा संपूर्ण रस्ता वाहून जाऊन या रस्त्यावरील वाहतूक बंद पडलेली होती. त्यानंतर गुत्तेदाराने शुक्रवार पुन्हा या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटी मोठे गोल पाईप टाकून व मुरुम पसरवून हा रस्ता सुरू केला होता. मात्र शुक्रवारच्या रात्री लहुकी नदीच्या वरच्या भागात औरंगाबाद तालुक्यात पुन्हा पाऊस पडल्याने या नदीला मोठया प्रमाणता पाणी आले. या पाण्याच्या प्रवाहाने हा बनवलेला तात्पुरता पूल पुन्हा वाहून गेला. त्यामुळे या भागातील दळणवळण पुन्हा बंद पडले. त्यातच रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे हे नियोजित दौर्यानिमित्त या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे पूल वाहून गेलेल्या असल्याने गुत्तेदाराने सकाळपासून या तात्पुरर्या पुलाची पुन्हा डागडुजी सुरू केलेली होती. असे असले तरी या पूलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे या भागातील वाहतुकीला वारंवार अडथळा येत असून या ठिकाणच्या गावांचा संपर्क मात्र वारंवार तुटत असल्याचे चित्र आहे.
Leave a comment