काही ठिकाणी थांबली पेरणी
मंठा । वार्ताहर
मागील आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस पडल्याने अनेक शेतकर्यांनी घाई करून कापूस,तूर, उडीद, मूग, सोयाबीन या पिकाची पेरणी केली आहे. पेरलेल्या पिकाची उगवण देखील चांगली झाली आहे. तालुक्यात बुधवार (ता.17) पर्यंत 40 टक्के पेरणी झाली असून त्यात तुर 1550 हेक्टर (75 टक्के),कापूस तेरा हजार 125 हेक्टर (60 टक्के), सोयाबीन 9830 हेक्टर (35 टक्के), मूग 1148 हेक्टर (23 टक्के), उडीद 287 हेक्टर (आठ टक्के) पेरणी झाल्याची माहिती कृषी कार्यालयातील व्हि .डि. मोरे यांनी माहिती दिली आहे. तालुक्यातील सर्वच मंडळात पेरणी योग्य दमदार पाऊस पडला असून बुधवार (ता. 17) पर्यंत मंठा मंडळात 76 मिमी, ढोकसाळ मंडळात 130 मिमी, तळणी मंडळात 104 मिमी, पांगरी गोसावी मंडळात 87 मिमी. पाऊस पडला असून आज पर्यंत तालुक्यात सरासरी 99.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात पेरणी योग्य दमदार पाऊस पडला असला तरी देखील जमीनीत ओल कमी असल्याने व तालुक्यात चार पाच दिवसा पासून ङ्गक्त ढगाळ वातावरण व पाऊस नसल्याने महागामोलाचे बियाणे, रासायनिक खत व मेहनत वाया जावू नये म्हणून उडीद, मूग, सोयाबीन या पिकाची पेरणी द्विधा स्थितीत थांबली असून आणखी पावसाची वाट पहात आहेत. तर कापसाच्या शेताची आखणी करून पाऊस लांबला तर पिकास पाणी देण्याकरिता शेतात ठिबक सिंचनची व्यवस्था करुन कापसाची लागवड करित आहेत. तालुक्यात नामांकित कंपनीचे बियाणे व रासायनिक खताचा तुटवडा जाणवत असून व्यापारी शेतकर्याकडून जास्त पैसे घेत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Leave a comment