जैन संघटनेच्यावतीने दिलीप राठी यांना गोसेवा भूषण पुरस्कार प्रदान
जालना । वार्ताहर
भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने देवमुर्ती येथील वृंदावन गो-सेवाधामचे संस्थापक तथा दै.पार्श्वभूमीचे संपादक दिलीप राठी यांना गोसेवा भूषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. जैन संघटनेच्या जिल्हा पदाधिकार्यांनी वृंदावन गो सेवाधामला भेट देवून गोसेवा संवर्धन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गो-सेवाधामचे संस्थापक दिलीप राठी यांना गोसेवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात जैन संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब म्हणाले की, दष्काळाच्या वेळी राज्यासह मराठवाडा, जालना जिल्ह्यात संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने शेकडो चारा छावण्या सुरु करुन लाखो जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर मध्यप्रदेशातून मालवाहतूक रेल्वेने सुमारे 1 हजार ट्रक चारा आणि कुट्टी जालन्यात आणण्यात आली आणि येथून मराठवाड्यातील सर्व गोशाळांना पाठविण्यात आली होती, अशी माहिती श्री. बंब यांनी दिली.
बंब पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यात सन 2012 मध्ये जालना जिल्ह्यासह राज्यभरात भीषण दुष्काळ पडला होता. अशावेळी जनावरांचा सांभाळ करणे कठिण होऊन बसले होते. त्यामुळे पशुपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवू लागले होते. अशावेळी भाकड गोवंश कत्तलखान्यात जाऊ नये, या उद्दात्त हेतूने पार्श्वभूमीचे संपादक दिलीप राठी यांनी वृंदावन गो-सेवाधामची स्थापना करून आजघडीला ते सुमारे दोनशे गोवंशाची अहोरात्र सेवा करत आहेत. ते पूर्णवेळ कर्मचार्यांसोबत या कार्यासाठी देत आहेत. गोसेवा हे पुण्याचे मोठे कार्य आहे. राज्याध्यक्ष या नात्याने आपण राज्यातील अनेक जिल्ह्यातील गोशाळांना भेटी दिलेल्या आहेत. मात्र, देवमूर्ती येथील वृंदावन गो-सेवाधाममधील गायींच्या चार्या-पाण्याची सुविधा, नियोजन आणि स्वच्छता पाहता ही गोशाळा आदर्श वाटली, असे गौरवोद्गार श्री. बंब यांनी काढले. यामागे दिलीप राठी यांचे अपार कष्ट आहेत. अशा शब्दात त्यांनी राठी यांच्या गो-सेवा कार्याचे कौतूक केले. सत्काराला उत्तर देतांना श्री. दिलीप राठी म्हणाले की, आठ वर्षापुर्वी दुष्काळ पडला होता, अशावेळी गोरगरीबांची गाय कत्तलखान्यात जाऊ नये, या उद्देशाने 5 गायींपासून वृंदावन गो सेवाधामची स्थापना करण्यात आलेली आहे. आजघडीला दोनशेच्यावर गायींचे पालन-पोषण करण्यात येत आहे. गायी, बैल आणि वासरांसाठी वेगवेगळे शेड उभारण्यात आलेले आहेत. त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने डॉक्टरदेखील नेमण्यात आलेले आहेत, असे सांगून श्री. राठी म्हणाले की, जैन समाजदेखील गायींच्या पालन पोषणात अग्रेसर आहे. गोमातेचे रक्षण करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वांनी एकतरी गाय पाळावी. हस्तीमल बंब यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. जैन संघटनेने प्रदान केलेल्या गोसेवा भूषण पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिकच वाढल्याचे श्री. राठी म्हणाले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी नरेंद्र मोदी, विजयराज सुराणा यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री. राठी यांचा जैन संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात येवून त्यांना गोसेवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अशोक संचेती, शिखरचंद लोहाडे, किरण रायबागकर, संतोष पहाडे, ताराचंद कुचेरिया, धनराज जैन, प्रकाश बोरा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. अभयकुमार सेठिया यांनी केले तर आभार पवनकुमार सेठिया यांनी मानले.
Leave a comment