जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्यै यांची माहिती
जालना । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात समाजातील प्रत्येक गोरगरीबाला धान्य मिळावे यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत एप्रिल ते जुन या कालावधीत गहू, तांदुळ, साखर, दाळी एकुण 36 हजार 594 मे. टन अन्नधान्याचे वाटप तर शिवभोजन योजनेच्या माध्यमातुन 1 लाख 2 हजार 770 लाभार्थ्यांना शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी दिली.
जिल्हा पुरवठा विभागासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी तर शैक्षणिक संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती आशा गरुड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातुन फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
पुरवठा विभागासंदर्भात माहिती देताना श्रीमती बसेय्यै म्हणाल्या, जालना जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातुन रेशनकार्ड धारकांना 1280 स्वस्तधान्य दुकानांमार्फत धान्य वितरणाचे काम करण्यात येते. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 2 रुपये दराने गहु, 3 रुपये दराने तांदुळ तर 20 रुपये किलोप्रमाणे साखरेचे वाटप करण्यात येत असुन एप्रिल ते जुन दरम्यान 3 हजार 921 मे.टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत 2 रुपये किलोदराने गहू, 3 रुपये दराने तांदुळ वितरित करण्यात येत असुन आतापर्यंत 15 हजार 493 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीबकल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते जुन दरम्यान लाभार्थ्यांना प्रतीव्यक्ती 5 किलो तांदुळ व प्रतीकार्ड एक किलो चना अथवा तुरदाळ अशा पद्धतीने एकुण 15 हजार 30 मे.टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1 हजार 745 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले. एपीएल केशरी योजनेंतर्गत मे व जुन महिन्यात 8 रुपये किलो दराने गहू व 12 रुपये किलो प्रमाणे तांदुळ अशा पद्धतीने 405 मे. टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे तर आत्मनिर्भर योजनेंतर्गत विस्थापित मजुर व विनाशिधापत्रिकाधारकांना 5 किलो प्रती तांदुळ व 1 किलो प्रती कुटूंब मोफत अख्खाचना वाटप सुरु करण्यात येत असुन उज्वला गॅस योजनेंतर्गत एकुण 77 हजार 385 लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही श्रीमती बसेय्ये यांनी यावेळी दिली.
समाजातील एकही व्यक्ती भुकेले राहू नये यादृष्टीकोनातुन सुरु करण्यात आलेले शिवभोजन केंद्रामार्फतही मोठ्या प्रमाणात शिवभोजन थाळयांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगत जालना जिल्ह्यातील एकुण 15 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातुन दरदिवशी 1 हजार 500 प्रमाणे लॉकडाऊनच्या काळात एकुण 1 लाख 2 हजार 770 गोरगरीबांना केवळ पाच रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहितीही श्रीमती बसेय्ये यांनी यावेळी दिली. शासनाकडून मास्क व सॅनिटायजर या वस्तुंचा जीवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केल्यामुळे तसेच कोव्हीड19 च्या काळात या वस्तुंचा तुटवडा भासु नये यासाठी या वस्तुंचा काळाबाजार करणार्यावर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 200 मास्क तसेच 730 नग सॅनिटायजरच्या बाटल्या जप्त करण्यात येऊन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. तसेच लॉकडाऊनच्या काळात दोन स्वस्तधान्य दुकानांवा परवाना रद्द तर सहा दुकानांचा परवाना निलंबित करण्याबरोबरच 38 रास्तभाव दुकानाची अनामत रक्कम जप्त करुन 25 स्वस्तधान्य दुकानदारांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती सांगत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.
शिक्षण विभागासंदर्भात माहिती देताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ म्हणाले, शालेय शिक्षण विभागाकडून टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या असुन पहिल्या पंधरवड्यात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करुन गावात, आपल्या भागात कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे काय, कंन्टेन्टमेंट झोन आहे काय याबाबत चर्चा करावयाची आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावयाचा आहे. प्रत्येक शाळांमध्ये निर्जंतुकीकरणाची कारवाई करण्यात यावी, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती आशा गरुड यांनीही शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने उपयुक्त अशी माहिती देत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
Leave a comment