धारदार शस्त्राचा धाक दाखवत 563 हजारांची रक्कम होती लांबवली
बीड । वार्ताहर
किराणा माल खरेदी करून शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरातून पीकअप घेवून जाणार्या व्यापार्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवुन त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम लंपास करणार्या 5 चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पेठ बीड पोलीसांनी ही कारवाई केली.
पप्पु शाम खुपसे (24), गोपी अंकुश कांबळे, रफीक नैमुद्दीन शेख, दादाराव नागनाथ चांदणे, अनिल बबन खुपसे (सर्व रा.पेठ बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. 25 एप्रिल रोजी व्यापारी अमोल अर्जुन कोळी (रा. पारगाव, जि. उस्मानाबाद) हे पिकअप वाहनातून (क्रं. एम.एच. 16, ए.वाय. 3916) किराणा माल खरेदी करण्यासाठी बीड येथे आले होते. किराणा खरेदीसाठी त्यांनी 53 हजारांची रक्कम सोबत आणली होती. ते बार्शी नाका येथून खंडेश्वरी मंदिराजवळील खिंडीतील कच्च्या रस्त्याने जात असताना भरदिवसा साडेबाराच्या सुमारास अनोळखी चोरटे त्यांच्या समोर आले. त्यातील एकाने अमोल कोळी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत खिशातील एक मोबाईल व 53 हजारांची रक्कम घेऊन धुम ठोकली होती. पेठ बीड ठाण्यात अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.
दोन आरोपी दहा तासात पकडले
पेठ बीड पोलीसांनी तात्काळ तपासचक्रे गतीमान करत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दहा तासात पप्पु व त्याचा साथीदार गोपी या दोघांना खंडेश्वरी मंदिराच्या टेकडीवरून ताब्यात घेतले. त्या दोघांनाही रविवारी (दि.26) न्यायालयासमोर हजर केले; त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. याचदरम्यान उर्वरीत आरोपींचा उपनिरीक्षक बनकर यांनी तपास सुरू ठेवला होता. पेठ बीड भागातून दादाराव व अनिल या दोघांना सोमवारी (दि.27) दुचाकीसह (क्र.एम.एच.23-ए.पी. 3436) ताब्यात घेत अटक केली. दरम्यान याच दिवशी अन्य आरोपी रफीक यास गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली.
पाचही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी
शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्याची रक्कम लांबवणार्या पाचही आरोपींना मंगळवारी (दि.28) बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्वांना चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व व्यापार्याचा मोबाईल पोलीसांनी चोरट्यांकडून हस्तगत केला. पेठ बीडचे निरीक्षक विश्वास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
Leave a comment