बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे औरंगाबाद येथे थांबलेल्या अंबाजोगाईतील एका नागरिकाचे घर फोडुन चोरट्यांनी किंमती ऐवज लंपास केला होता. 19 एप्रिलच्या पहाटे शहरातील लालनगरमध्ये ही घटना घडली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्हयातील 2 चोरट्यांना ताब्यात घेतले. सोमवारी (दि.27) रोजी ही कारवाई करण्यात आली. गुन्हयात चोरीला गेलेले काही साहित्यही चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुस्तफा करीम परसुवाले (रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) व शफिकखान जानूखान पठाण (रा. अंबाजोगाई) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. शहरातील लालनगर येथील अब्दुल अजीज बागवान हे लॉकडाऊनमुळे 18 ते 19 एप्रिल दरम्यान औरंगाबाद येथे थांबले होते. याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून आतमध्ये प्रवेश करत किमती ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. दरम्यान सोमवारी गुन्हे शाखेचे पथक अंबाजोगाईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना त्यांनी मुस्तफा यास ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने त्याचा साथीदार शफीकखानच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान त्यालाही पोलीसांनी ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीला गेलेला एक संगणक संच, एलईडी, एक कुलर, गॅस शेगडी व पितळी भांडे असा मुद्देमाल हस्तगत केला.पुढील तपासकामी दोघांनाही अंबाजोगाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान या चोरट्यांकडून चोरीचे सोने व चांदीचे दागिने हस्तगत करण्याची कारवाई पोलीसांकडून सुरू आहे. ही कारवाई एस.पी. हर्ष पोद्दार, अप्पर अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत, उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, कर्मचारी भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, शेख नसीर, मुंजाबा कुव्हारे, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, नारायण कोरडे, शेख अन्वर, वाहनचालक संजय जायभाये, संतोष हारके यांनी केली.
चोरीच्या दोन दुचाकींसह सराईत गुन्हेगार ताब्यात
पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार श्रावण गणपत पवार यास नवगण राजुरी (ता.बीड) येथील बाजारतळावर चोरीच्या बुलेटसह सोमवारी ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्याची सखोल चौकशी केली असता गतवर्षी खोकरमोहा (ता.शिरूर) येथून ही बुलेट चोरी केल्याची कबुली त्याने दिली.नंतर पोलीसांनी बुलेटबाबत (क्रं. एम.एच. 23-बी.ए. 4788) खात्री केली असता ती मारोती कोंडीबा खरमाटे (रा. खोकरमोहा) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. 1 ऑक्टोबर 2019 रोजी ती चोरीला गेल्याची नोंद शिरूर ठाण्यात सापडली. याच गुन्हेगाराने शिक्रापुर (जि.पुणे) येथून 1 दुचाकी चोरून आणत ती घरात लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी दोन्ही दुचाकी हस्तगत करत आरोपीस पुढील तपासकामी दोन्ही दुचाकींसह शिरूर पोलीसांच्या स्वाधीन केले.
Leave a comment