बीड । वार्ताहर
संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढा देत आहे. या संकट काळात सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी या बरोबरच सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या संकटापासून जनतेला दुर ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या खर्या हिरोंना अशा संकट काळात मनापासून सहकार्य केले पाहिजे. या सर्व घटकांवर कोणीही मानसिक तणावातून हल्ला अथवा मारहाण करण्याचा प्रयत्न करु नये असे कृत्य करणार्यांविरुद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल असा इशारा आज पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे.
या बाबत आज मंगळवारी (दि.28) सकाळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्यांनी कोरोना या संसर्गजन्य आजारापासून नागरिकांना दूर ठेवण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करणार्या सर्व डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, परिचारीका, आरोग्य कर्मचारी या बरोबरच जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास रस्त्यावर बंदोबस्त करणार्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांप्रति प्रत्येकाने सन्मानाची भावना ठेवावी असे आवाहन केले आहे. हे सर्व घटक कोरोना विरोधातील संकटापासून नागरिकांना दुर ठेवणारी भिंत म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. या सर्व ‘हिरोंमुळेच’ आपण सर्व नागरिक सुरक्षित आहोत. त्यामुळे अशा स्थितीत नागरिकांनी मानसिक तणावातून आपला क्रोध या घटकांवर व्यक्त करणे चुकीचे आहे. कोणीही असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताविरुद्ध पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल असा इशाराही पोद्दार यांनी दिला आहे. दरम्यान कोरोनामुळे मुंबईतील दोन पोलीस शहीद झाले. त्यांच्याप्रति बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोद्दार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Leave a comment