चेकपोस्टवर तपासणी; 32 हजार ऊसतोड मजुर स्वगृही परतले
बीड | वार्ताहर
जिल्हा प्रशासनातील आरोग्य यंत्रणेसह पोलीस, महसुल, कृषी यासह सर्वच घटकांनी कोरोनाविरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी केलेली मेहनत कामाला आली आहे. म्हणूनच शेजारच्या जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडत असतांना बीड जिल्हा मात्र कडेकोट उपाय योजनांमुळे कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान राज्य शासनाने 17 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी गेलेल्या राज्यभरातील मजुरांना त्यांच्य मूळगावी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिनाभरापासून गावापासून दूर अडकुन पडलेल्या मजुरांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान या मजुरांना जिल्ह्याच्या सिमेवरुन आतमध्ये प्रवेश देण्यापूर्वी चेकपोस्टवर त्यांची आरोग्य तपासणी करुन पुढील 28 दिवसांसाठी होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जात आहे. सोमवारपर्यंत (दि.27) जिल्ह्यात 32 हजार 283 मजुर स्वगृही परतले आहेत.
ऊसतोड मजुर पुरवणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख सांगितली जाते. दर वर्षी आक्टोबर ते मार्च या सहा महिन्याच्या कालावधीत 4 लाखाहून अधिक मजुर पश्चिम महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकमध्ये ऊसतोडणीसाठी जातात. यंदाही अशाच पद्धतीने हे मजूर तिकडे स्थलांतरीत झाले. मार्च महिन्यात राज्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला. त्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. सुरुवातीचा हा लॉकडाऊन 21 दिवसांचा होता. 15 एप्रिलला त्याची मुदत संपणार होती. परंतू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने दुसर्यांदा 19 दिवसांच्या म्हणजेच 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक मजुर कारखाना परिसरातच अडकुन पडले. या मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवावे अशी मागणी होवू लागल्याने राज्य शासनाने 17 एप्रिलला या बाबतचा एक निर्णय घेतला. त्यानुसार मजुरांना वाहनातून त्यांच्या मूळगावी पाठवण्याची व्यवस्था संबंधीत कारखाना प्रशासनाने करण्याचे आदेश देण्यात आले. आता मागील सहा दिवसांपासून हे मजूर जिल्ह्यातील 20 चेकपोस्टवरुन आपल्या मूळगावी परतत आहेत. दरम्यान या मजूरांना त्यांच्या गावाला पोहचेपर्यंत कोणतीही अडचण येवू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या ठिकाणी दोन वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले गेले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत 32 हजारांहून अधिक जिल्ह्यात परतले आहेत. अजुनही काही मजूर जिल्ह्यात परतत आहेत.
आरोग्य यंत्रणा सतर्क
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मागील एक महिन्यापासून बीड जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणाहून सुरुवातीला जे लोक जिल्ह्यात परतले त्या प्रत्येकांची आरोग्य अधिकार्यांकडून चेकपोस्टवर तपासणी करण्यात आली. शिवाय त्यानंतरही तपासणीचे काम आजपर्यंत सातत्याने सुरु आहेत. चेकपोस्टवर कडेकोट तपासणी केली जात असल्याने बीड जिल्हा कोरोनामुक्त राहिलेला आहे. यात सर्व आरोग्य यंत्रणेचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. आजपर्यंत ऊसतोड कामगार वगळता जिल्ह्यात 74 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली गेली आहे. पर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या दिड लाखाहून अधिक लोकांची नोंदही आरोग्य यंत्रणेने ठेवली आहे. चेकपोस्टवर सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक, पर्यवेक्षक हे सारे घटक 24 तास या ठिकाणी कार्यरत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment