५५ पेक्ष्या जास्त वय असलेले पोलीस घरीच थांबणार
मुंबई । वार्ताहर
मुंबई पोलिस दलातील तीन हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस खात्यातील जेष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, ज्यांचे वय 55 पेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तामध्ये सहभागी होऊ नये अशी सूचना दिली आहे.
राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे. यातील ७ पोलीस बरे झाले असून १०० जणांवर उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील ४० हून अधिक पोलिसांचा समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महिन्याभरापूर्वी ५५ वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या, मधुमेह किंवा हृदयरोगाने त्रस्त शिपाई ते साहाय्यक उपनिरीक्षकांना कामावर बोलावू नका, अशा तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, ही बाब परिस्थितीनुसार अंमलात आणावी, असा अर्थ घेत या वयोगटातील पोलिसांना कामावर बोलावणे सुरूच ठेवले. तर काहींना बंदोबस्तालाही जुंपले. अशात तीन दिवसांत पन्नाशी ओलांडलेल्या तीन पोलिसांचा कोरोनाने बळी घेतल्यानंतरवाहतूक पोलिसांसह पोलीस ठाणे तसेच अन्य शाखांमधील ५५ वर्षांपुढील अंमलदारांना सुट्टीवर पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस दलात पन्नाशी उलटलेल्या व आजारी असलेल्या अंमलदारांची माहिती आता गोळा करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष कक्ष तयार केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शिवाय पोलीस ठाण्याकडून यासंदर्भात माहिती दिल्याचेही एका वरिष्ठ निरीक्षकाने सांगितले. पहिल्या टप्प्यात ५५ वर्षीय पोलिसांना ३ मे पर्यन्त घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ५२ वर्षावरील मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून मंगळवारी देण्यात आल्या आहेत.
हवालदारांना स्वतःहून कामास यायची इच्छा असेल तर त्यांना येऊ द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच गंभीर शारीरिक आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. 55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Leave a comment