केज । वार्ताहर
परिसरात अवैध धंदे, चोरटी व गावठी दारू विक्री आणि हातभट्टीच्या संदर्भात ग्रामस्तरावर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तात्काळ बंदोबस्त करून पोलीसांना माहिती द्यावी अशा प्रकारची नोटीस केज ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी हद्दीतील ग्रामपंचायतीला दिले आहेत.
गावात आणि गावच्या हद्दीत चालणारे अवैद्य धंदे व चोरटी दारू विक्री त्याच बरोबर गावठी हातभट्टी यांची माहिती गावातील लोकप्रतिनिधी यांना असते. या माहितीचा पोलिसांना उपयोग करून असे अवैद्य धंदे बंद करण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रभाविणे राबविता यावा; म्हणून केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी निश्चय केला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक हे जसे ग्रामस्तरावर प्रमुख आहेत. त्याच प्रमाणे गावातील कायदा व सुव्यवस्था आणि अवैद्य धंदे रोखण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 134 प्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच आणि ग्रामसेवक यांना नोटीस देण्यात येणार आहेत तर काही ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. त्यात दारुबंदी संदर्भात घडलेला कोणताही अपराध,अपराधकरण्याचा हेतु किंवा करण्याची तयारी याची माहिती समजल्यास त्वरीत पोलीसांना देण्यात यावी. दारुबंदी संदर्भात जो अपराध घडल्याचे अगर घडण्याच्या बेतात किंवा घडण्याचा संभव आहे. असे सकारण वाटत असल्यास तो अपराध घडण्यास प्रतिबंध करण्याच्या कामी सर्व उपाय योजणा अमंलात आणण्यास सरपंच व ग्रामसेवक हे कायद्यान्वये बांधिल आहेत. या बाबत जर हयगय व निष्काळजीपणा केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असाही उल्लेख आहे.दरम्यान दारूबंदी संदर्भात ग्रामस्तरावर अशा प्रकारे उपाय योजना करणारे केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी राबविलेल्या या अनोख्या उपायांची व पद्धतीची चर्चा सर्वत्र होत असून त्यांचे अभिनंदन देखील होत आहे. यामुळे गावठी व हातभट्टीवाले आणि अवैध दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहे. याबाबत पो.नि.प्रदिप त्रिभुवन म्हणाले, दारूबंदी करणे हे सरपंच आणि ग्रामसेवकांचेही कर्तव्य असून याबाबत टाळाटाळ होऊ नये अन्यथा लोकसेवकांवरही कार्यवाही होऊ शकते.
Leave a comment