बीड । वार्ताहर
दोन दिवसापूर्वी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सौर ऊर्जेच्या बटर्या चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला, मात्र खरा प्रश्न हा आहे की, चौवीस तास जो परिसर सीसीटिव्हीच्या निगराणीखाली आणि पोलीसांच्या पहार्यात असतो, तेथून बॅटर्या चोरीला जातातच कशा? यापूर्वीही गेवराई तालुक्यातील जप्त केलेल्या वाळूची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून चोरी झाली होती, त्याचे पुढे काय झाले? याचे उत्तरही जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेले नाही.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून सौर उर्जा प्रकल्पाच्या बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष धर्माधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 22 एप्रिलच्या पुर्वी अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील सौर उर्जा प्रकल्पाच्या बॅटर्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. मात्र सीसीटिव्ही असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येवून चोरटे बॅटर्या चोरुन नेत असतानाही त्याचा कोणालाच थांगपत्ता लागत कसा नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. आता पोलीस तपास सुरु झाला आहे. जिल्ह्याच्या महत्वाच्या कार्यालयातील साहित्याची चोरी झाल्याने याचा तातडीने तपास होण्याची गरज आहे.
Leave a comment