चिंचपूर, सौताड्यात आरोग्य अधिकार्यांची बैठक
बीड । वार्ताहर
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान हे शहर बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या दोन तालुक्यांच्या सीमेवर असल्याने या ठिकाणाहून बीड जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. जामखेडमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाने आष्टी तालुक्यातील सहा गावांना बफर झोन म्हणून घोषीत केले आहेत. सोमवारी (दि.27) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी या ठिकाणी भेट दिली. सौताडा व चिंचपूरमध्ये त्यांनी आरोग्य कर्मचार्यांची बैठक घेत सूचना दिल्या.
जामखेड शहर हे पाटोदा आणि आष्टी या दोन्ही तालुक्यांशी जवळ आहे. त्यामुळे येथून बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून या मार्गे येणारे वाहतूकीचे सर्व रस्ते बंद केले गेले आहेत तर सहा गावांना बफर झोन घोषीत करुन तेही अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत. सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी सौताडा येथे पाटोदा तालुक्यातील तर चिंचपूर येथ आष्टी तालुक्यात बफर झोनमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,ग्रामंचायत कर्मचारी,शिक्षक,अंगणवाडी कार्यकर्ती,आशा स्वयंसेविका यांची बैठकीला उपस्थिती होती. सामाजिक अंतर ठेऊन बैठक घेतली गेली.
आरोग्य सर्वेक्षण गांभीर्याने करा
गावात आरोग्य सर्वेक्षण गांभीर्याने करा,ताप,सर्दी, खोकला याचे रुग्ण आढळल्यास त्यांची तपासणी करुन वरिष्ठांना कळवा, कोरोना सदृश्य असलेल्या व्यक्तींची माहिती द्या, गावात कुणी नवीन आले आहे का याची माहिती घ्या, बाहेरुन कुणाला येऊ देऊ नका, तसेच आरोग्य विषयक उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिल्या.यावेळी पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ एल.आर.तांदळे,आष्टीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोटुळे यांची उपस्थिती होती.
Leave a comment