पाच हातभट्ट्या उध्वस्थ; पाच जणांवर गुन्हा
परळी । वार्ताहर
स्थानिक गुन्हे शाखचे विशेष पथक आणि परळी ग्रामीण ठाण्याच्या पोलीसांनी तालुक्याती धारावती तांडा शिवारातील शासकीय गोदाम व याच परिसरातील एका शेतातील घराजवळ सुरु असलेल्या हातभट्टी दारु अड्ड्यावर छापे मारले. या परिसरातील एकुण पाच हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. रविवारी (दि.26) केलेल्या या कारवाईत एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने दारुवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीसांना पाहून दारुवाले सैरावैरा पळून गेले.
जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही परळी तालुक्यातील धारावती तांडा येथे मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टी दारु तयार केली जात होती. याची कुणकूण गुप्त बातमीदाराकडून गुन्हे शाखेला लागली, त्यानंतर ग्रामीण पोलीसांसह या ठिकाणी छापा मारण्याचे नियोजन करण्यात आले. रविवारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे सपोनि आनंद कांगुणे, परळी ग्रामीण ठाणे प्रमुख पोनि शिवलाल पुर्भे व इतर कर्मचाजयांनी धारावती तांडा परिसरात छापा टाकला. यावेळी परिसरातील शासकीय गोदामापाठीमागे त्रिंबक विठ्ठल राठोड,अंकुश धनू राठोड हे त्यांच्या शेतात हातभट्टी दारु तयार करण्यासाठी गूळमिश्रित रसायन बनवत होते. पोलिसांना पाहताच दोघांनी तेथून धूम ठोकली. याठिकाणी आठ हजार रुपये किमंतीचे 400 लिटर गूळमिश्रित रसायन व 5 लिटर गावठी हातभट्टी दारु नष्ट केली गेली. दरम्यान ही कारवाई करुन परतत असताना पोलीसांना याच परिसरातील एका शेत घर परिसरात भाऊराव गोविंद पवार, प्रविण बाबूराव पवार, गीताबाई देविदास राठोड हे हातभट्टी दारु तयार करीत होते. पोलिस फौजफाटा तेथे धडकताच तिघांनीही पळ काढला. या ठिकाणाहून 12 हजारांची गावठी दारु, 600 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. या दोन्ही कारवाया परळी ग्रामीणचे पोनि शिवलाल पुर्भे, सपोनि आनंद कांगुणे, पोना सखाराम पवार, झुंबर गर्जे, संतोष हंगे, गहिनीनाथ गर्जे, गोविंद काळे, परळी ग्रामीणचे पोह हंगे, गीते, चाटे यांनी केल्या.
Leave a comment