बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात सोमवारी (दि.27) सकाळी बीडमधून 1 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 2 असे एकुण 3 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते ते सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
सध्या बीड जिल्हा कोरोनामुक्त आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे. सोमवारी तीन जणांच्या थ्रोट स्वॅबचे रिपोर्ट तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला हे रिपोर्ट प्राप्त झाले, ते तीनही रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पाठवलेले सर्व 192 रिपोर्ट निगेटिव्ह ठरले आहेत. यात बीड जिल्हा रुग्णालयातून पाठवलेल्या 145 तर अंबाजोगाईच्या स्वाराती विलगीकरणातून पाठवलेल्या 47 स्वॅब नमुन्यांचा समावेश आहे.
गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेटिंग
सोमवारी बीड शहरात एक दिवसाआड अडीच तासांसाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती.या दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करु नये व आपल्या घराजवळच भाजीपाल्याची खरेदी करावी यासाठी शहरातील जालना रोडसह अन्य भागात बॅरिकेंटिग करुन रस्ते बंद करण्यात आले होते.
एसआरटीमधील स्वॅब लातूरला तपासणार
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या विलगीकरणात दाखल होणार्या कोरोना संशयिताचे स्वॅब नमुने सोमवारपासून लातूर येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यास सुरुवात झाली आहे. आजचे दोन्ही रुग्णाचे स्वॅब नमुने लातूरला पाठवण्यात आले होते. दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातील संशयितांचे स्वॅब औरंगाबादच्या प्रयोगशाळेत तपासले जातील. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी ही माहिती दिली.
Leave a comment