बीड । वार्ताहर
कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. गत एक महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे इंधन विक्री बंदच आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनानांच इंधन पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्या व्यतिरिक्त इंधन पुरवठा करता येत नाही.शिवाय बाटल्यांमध्येही नागरिकांना इंधन देता येत नाही. बीडमध्ये अशाच प्रकरणात एक पंप मागे सिल करण्यात आला होता, नंतर तो सुरु झाला. दरम्यान शहरातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीचा खप तब्बल दहा टक्क्यांवर घसरलेला आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन पुरवठा करण्याचे निर्देश असल्याने पेट्रोल पंपावरील इंधन विक्री दहा टक्क्यांवर घसरली आहे. बीड शहरात जवळपास 18 हून अधिक पेट्रोल पंप आहेत. या पंपांवरील इंधन विक्री रोज सरासरी तीन लाख लिटर होत असते. सध्या केवळ तीस हजार लिटर इंधन विक्री होत आहे. पेट्रोल पंप चालकांना इंधन विक्रीत झालेल्या घटीमुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या व्यवसायावर तब्बल अनेकांची कुटुंबे अवलंबून आहेत. या कामगारांचा पगार, प्रॉव्हिडंट फंड, एसआयएससी अशा धोरणात्मक बाबी पंप चालकांना सांभाळाव्या लागतात.याव्यतिरिक्त इंधन खरेदीसाठी तसेच पेट्रोल पंपावर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पंपचालकांनी बँकांची कर्जे उचललेली आहेत. कर्जाचे व्याज वाढत असल्याने पंप चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. बाहेर कसे पडायचा हा विचार सुरू आहे.शहरातील पेट्रोल पंपावर सुरक्षेसाठी महिला पोलीस मोठ्या प्रमाणावर नेण्यात आले आहेत. हे कर्मचारी परिस्थिती बघून निर्णय घेतात. एकंदरच कोरोनामुळे पेट्रोलपंप चालकही हैराण झाले आहेत.
Leave a comment