बीड । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन कंबर कसून उपाययोजना करत आहे. गरजूंना मदत करत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालयामार्फत बीड जिल्ह्यातील बचत गट मदत कार्यात सहभाग नोंदवत आहे. माविम अंतर्गत जिल्ह्यातील 2 हजार 485 बचत गटांच्या एकूण 29 हजार 69 महिलांनी आपल्या परीने मदतीचा सेतू तयार केला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड मार्फत बीड जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रातील 233 गावे व 7 शहरात काम करीत आहे. अल्प दरात मास्क वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप, रेशनिंग वाटपासाठी मदत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत, सोशल डिस्टनिंगबाबत जनजागृती अशा विविध स्तरावर हे मदत सत्र सुरू आहे. ही कामे लोकसंचलित साधन केंद्रामार्फत 2 हजार 485 बचत गटांच्या एकूण 29 हजार 69 महिला व त्यांच्या कुटुंबासाठी सुरू आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बचतगटातील महिला व माविम बीड परिवार यांच्याकडून 41 हजार 500 रुपये जमा करण्यात आले. तसेच, कोविड -19 च्या संकट काळात बचतगटातील महिलांना मदत करण्यासाठी गावामधील दानशूर व्यक्ती व संस्था, महिला गावप्रतिनिधी व लोक संचलित साधन केंद्राच्या पदाधिकारी व स्टाफ यांनी विशेष सहभाग घेऊन धान्य व इतर जीवनावश्यक सामानाच्या 2 हजार 147 किट्स गेवराई, बीड, केज, अंबाजोगाई शहरामधील व ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांना वाटप केल्या आहेत. या किटमध्ये 5 किलो तेल, 20 किलो आटा, 5 किलो तांदूळ, 10 किलो गहू, साबण, मिरची पावडर, साखर, चहा इत्यादी यांचा समावेश आहे.
माजलगाव कार्यालयामार्फत 130 स्थलांतरीत मजूर व भटके जमातीतील गरजू कुटुंबांना गेल्या 8 दिवसापासून मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, केज, बीड व अंबाजोगाई तालुक्यातील बचतगटामार्फत एकूण 28 हजार 700 मास्क तयार करण्यात आले. यापैकी 15 हजार 500 मास्क प्रति मास्क अडीच ते तीन रुपयेप्रमाणे तयार करून नगरपरिषद, मेडिकल स्टोअर्स, दुकानदार व सामाजिक कार्यकर्ते यांना देण्यात आले. तसेच 13 हजार 200 मास्क बचतगटातील गरीब महिलांना अल्पदरात ना नफा ना तोटा या तत्वावर प्रति मास्क बारा रुपये दराने उपलब्ध करून दिले. ज्यांनी उज्ज्वला गॅस कनेक्शन घेतले आहे, पण गेल्या 5 ते 6 महिन्यापासून सिलेंडर भरून आणले नाही, अशा महिलांना बचतगटातून सवलतीचे अंतर्गत कर्ज देवून 782 महिलांना गॅस गावातच घरपोच सिलेंडर उपलब्ध करून दिले व त्याची 100 टक्के सबसिडी पण जमा व्हायला सुरुवात झाली. लॉकडाऊन व सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन होण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील बचतगट जनजागृती करीत आहेत.
Leave a comment