माजलगाव । वार्ताहर
संपूर्ण देशात कोविड-19 या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक मजूर व बांधकाम कामगार बेरोजगार झाले आहेत म्हणून सिटू कामगार संघटनेच्या महाराष्ट्रराज्य कमिटीने महाराष्ट्र शासनाकडे कामगारांसाठी आर्थिक स्वरूपाची मदत करावी अशी मागणी केली होती व त्याचा सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन शासनाने नोंदणीकृत व नूतनीकरण झालेल्या कामगाराच्या खात्यावर दोन हजार रुपये आर्थिक मदत करण्याचे घोषित केले अशी माहिती सिटू कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. शिवाजी कुरे यांनी दिली.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. कारण लाँकडाऊन परिस्थितीमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद पडली आहेत. त्यामुळे अनेक कामगारावर बेकारीचे संकट ओढवले आहे. म्हणून शासनाने ही मदत घोषित केली आहे. ही मदत सरळ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी कसल्याही प्रकारचा अर्ज भरण्याची गरज नाही किँवा बीड येथील कार्यालयात ही जाण्याची आवश्यकता नाही ही बाब जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी लक्षात घ्यावी त्याच बरोबर कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. या कामासाठी एखादा व्यक्ती जर कामगारांना पैसे मागत असेल तर त्याची तक्रार बांधकाम सरकारी अधिकारी बीड यांना किँवा आपल्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे आव्हान या कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कुरे यांनी केले आहे.
Leave a comment