धारुर । वार्ताहर
शेतीच्या वादातून भावाने व त्याच्या मुलांनी आपल्या दुसर्या वृद्ध भावाला जबर मारहाण केली होती. यात गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हिंगणी येथे हा प्रकार घडला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या मृताच्या पुतण्याला दिंद्रूड पोलिसांनी शनिवारी (दि.25) अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ज्ञानोबा सोळंके असे मृत शेतकर्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी शेतातून घरी येत असताना त्यांना भाऊ मधुकर सोळंके, पुतणे श्याम सोळंके, सिद्धेश्वर सोळंके आणि दयानंद सोनवणे यांनी अडवून जमीनीच्या वादातून दगड व विटांनी मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊ मधुकर व पुतण्यांविरोधात खूनाचा गुन्हा दिंद्रूड पोलिसांत दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपासून हे आरोपी फरार होते. यातील मुख्य आरोपी असलेला सिद्धेश्वर सोळंके याचा भांडणात हात मोडला होता परळी येथे उपचार घेऊन तो फकीर जवळा शिवारात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी पहाटे 3 वाजता त्याना पथकाने अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.
Leave a comment