संग्रहित फोटो
कारखानदारांनी उसतोड कामगारांचे हाल केले
गेवराई । वार्ताहर
माणसांचे खायचे वांदे...मिळाले तर मिळाले नाही तर अर्ध पोटी राहून दिवस काढावा लागायचा...आला दिवस चालला..आम्हाला खायला दिले पण मुक्या जनावरांना चारा मिळेना...आम्हाला दिलेले दोन घास अन्नदान तोंडात फिरायला लागले....बैलांना उपाशी पोटी ठेवून जीव कासावीस होऊ लागला...आणि म्हणून...गावाची वाट धरली...दर मुक्काम दर कोस करून गाव जवळ करीत असता...साखर झोपेत असताना अचानक पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने....सगळा संसार रस्त्यावर अस्ताव्यस्त झाला....संवेदनशील मनाला वेदना देणारी कहाणी... उसतोड कामगार म्हणून कष्ट करणार्या दोन जोडप्याची...!
पश्चिम महाराष्ट्रातल्या भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव ता.आंबेगाव जि.पुणे, येथील कारखान्यावर 14 जोड्या लेकराबाळासह उसतोड करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये गेलेल्या होत्या. कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे कामगारांना समस्या निर्माण झाल्या. काम थांबले, घरचा रस्ता ही बंद झाला होता. काही दिवस कारखानदारांनी मदत केली. परंतू , काही दिवसातच मदत थांबली. जनावरांचे हाल होऊ लागले. लॉकडाऊन झाल्यावर या सगळ्या कामगारांना कारखाना परीसरात ठेवण्यात आले होते. काही दिवस आवश्यक किराणा कीट देण्यात आले. मात्र त्यात सातत्य नव्हते. एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात कारखाना व मुकादमाने दुर्लक्ष केल्याने, कामगार अडचणीत आले. बैल बारदाना उपाशी पोटी ताटकळत उभा राहिला होता. हे दृश्य पाहून कामगारांचा जीव कासावीस होऊ लागला, त्यामुळे कामगारांनी घराचा रस्ता धरण्याचा निर्णय घेतला. उपाशी तपाशी राहून येथे बसण्यापेक्षा घर जवळ करूयात, या अपेक्षेने कामगारांच्या 14 गाड्या गावाकडे निघाल्या. तीन दिवस सगळे सोबत चालत होते. एकमेकांच्या सोबतीने गाव जवळ करीत निघाले होते. वेगवेगळ्या गावचे कामगार चौफुली येताच वेगळे झाले. त्यातल्या दोन गाड्या बीड जिल्ह्याच्या दिशेने निघाल्या. दुर्दैवाने दोन्ही बैलगाडीला अपघात झाला. अपघातात साळवे पंढरीनाथ सर्जेराव, साळवे मनिषा पंढरीनाथ, ढोणे ज्ञानेश्वर यादव, ढोणे इंदुबाई ज्ञानेश्वर, हे गंभीर जखमी झाले. या दोन्ही जोड्या भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव ता.आंबेगाव जि.पुणे, कारखान्याला होत्या. अचानक एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार कामगार गंभीर जखमी झाले. चौघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेले. संसार उपयोगी वस्तू रस्त्यावर विखुरल्या गेल्या. संसारोपयोगी साहित्य रस्तावर पडले. दोन बैल जोडीला मार लागल्याने त्यांना चालता येत नव्हते. हंगाम संपल्यावर साखर कारखान्याने कामगारांना घरी सोडावे लागते, असा नियम असतांना, कामगारांना बैलगाडीने का जाऊ दिले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कसल्या संघटना अन कुठय मुकादम?
उसतोड कामगारांचे हाल होत असताना, ना मुकादमाने धीर दिला ना कामगार नेते धावून आले. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या उसतोड कामगारांचे प्रचंड हाल झाले. मिळाले तर दोन घास नसता, दोन घोट पाणी पिऊन कामगारांनी तीन रात्र आणि तीन दिवस काढलेत. वाटेत काहीनी मदत केली. एक पोलिस अधिकारी भेटले. त्यांनी विचारपूस करून, मदत केली. खर म्हणजे, ज्या कारखानदाराने कामगारांना वार्यावर सोडले, त्यांना शासनाने जाब विचारला पाहिजे. मुकादमाने काढता पाय घेतला. त्याने पाठ फिरवली. कामगार नेते ही गायब झाले होते. त्यामुळे कामगार घराकडे निघाले होते.
Leave a comment