एका संशयिताचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह
बीड | वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात शुक्रवारी दाखल झालेल्या एकूण सहा जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. पैकी एकाचा रिपोर्ट शनिवारी (दि.25) सायंकाळी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. उर्वरित, 5 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे आढळलेला एकमेव बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी परतल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी शुुक्रवारी आणखी सहा जण विलगीकरण कक्षांमध्ये दाखल झाले. ते सर्व जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पैकी गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल शनिवारी सायंकाळी बीडच्या आरोग्य विभागास प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आल्याने पुन्हा एकदा समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु, अजूनही पाच अहवालांची प्रतीक्षा कायम आहे.दरम्यान आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात 181 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. नागरिकांनी घरातच थांबावे तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालय जवळ करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.
परदेशातून आलेले क्वारंटाईनमुक्त
जिल्ह्यात विदेशातून ११८ जण आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष होते. त्यांची दोनवेळा वैद्यकीय तपासणी केली होती. त्यानंतर त्यांच्या हातावर शिक्के मारुन होमक्वारंटाईन केले होते.त्या सर्वांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून आता ते ठणठणीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
29 हजार मजूर स्वगृही
पश्चिम महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यासाठी ऊसतोडी करण्यासाठी गेलेले लॉकडाऊनमुळे तेथेच अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे जिल्ह्यात शनिवारी (दि.25) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 29 हजार 394 मजूर स्वगृही परतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
Comments (1)
माहिती पूर्ण बातमी
Leave a comment