(प्रतिकात्मक फोटो)
संचारबंदीतही जिल्ह्यात चोर्यांचे सत्र सुरुच
अंबाजोगाई । वार्ताहर
संचारबंदी लागू असतानाही बीड जिल्ह्यात चोर्यांचे सत्र सुरुच आहे. अंबाजोगाई शहरातील लालनगर येथे घरफोडीची घटना समोर आली आहे. कुलूप तोडून चोरट्यांनी किमंती ऐवज लंपास केला. शहर ठाण्यात या प्रकरणात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मोहम्मद आबेद अब्दुल अजिज बागवान (46) या व्यावसायिकांचे शहरातील लालनगरमध्ये घर आहे. दि.19 ते 24 एप्रिलच्या कालावधीत चोरट्यांनी बागवान यांच्या घराच्या कंपाऊडवर चढून आत प्रवेश कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख 32 हजारांची रक्कम, सोन्याची 18 हजारांची बोरमाळ, 33 हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 16 हजारांचा सोन्याचा अन्य अलंकार, 5 हजारांचे एक कुलर, 10 हजारांचा एक संगणक, 6 हजारांचे चांदीचे पैंजन, 1 गॅस सिलेंडरसह 2 हजारांची विविध भांडी असा 1 लाख 21 हजारांचा ऐवज चोरांनी हातोहात लंपास केला. दरम्यान घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुक्रवारी (दि.24) सायंकाळी मोहम्मद आबेद बागवान यांनी शहर ठाण्यात तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-----------
Leave a comment