बीड । वार्ताहर
वाळू चोरीसह इतर गुन्ह्यात औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबध्द केलेल्या एका आरोपीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या सल्लागार मंडळाने गुरूवारी (दि.23) अंतिम सुनावणी घेतली. यावेळी तलवाड्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे व गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत यांची साक्ष नोंदवण्यात आली.सरकार पक्षाच्यावतीने दोन्ही अधिकार्यांनी अभ्यासू बाजू मांडली. त्यावर सल्लागार मंडळाने आपले मत शासनास कळवले. शासनाच्यावतीने गृह विभागाचे कक्ष अधिकारी यांनी संबंधीस आरोपीस जिल्हाधिकारी बीड यांनी एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात ठेवण्याचे दिलेले आदेश कायम ठेवले आहेत.
बळीराम नामदेव बेडके (29, रा.राजापूर ता.गेवराई) असे स्थानबध्द ठेवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तलवाडा ठाण्यात वाळू चोरीचे तीन व इतर दोन गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी पोलिस अधिक्षकांनी त्यास जिल्ह्यातून हद्दपार केले होते. परंतू हद्दपार झाल्यानंतरही त्याच्या वाळू चोरीच्या कारवाया थांबल्या नव्हत्या. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत तो जिल्ह्यात येवून वाळू चोरीचे गुन्हे करत असल्याने कलम 142 मोकोका प्रमाणे त्याच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणात बीडचे जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी 10 मार्च 2020 रोजी बळीराम बेडके यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्दतेचे आदेश जारी केले होते. त्यानंतर 12 मार्च 2020 रोजी कोठाळा (ता.घनसावंगी जि.जालना) येथून त्यास ताब्यात घेण्यात आले होते. नंतर 13 मार्च रोजी त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या आरोपीबाबत गुरूवारी उच्च न्यायालयाच्या सल्लागार मंडळाने अंतीम सुनावणी ठेवली तेव्हा तलवाडा व गुन्हे शाखेच्या अधिकार्याने सरकारी पक्षाच्यावतीने अभ्यासू बाजू मांडली. सल्लागार मंडळानेही आपले मत शासनाला कळवले. त्यानंतर शासनाच्यावतीने कक्ष अधिकारी गृहविभाग (विशेष) मंत्रालय, मुंबई यांनी या इसमास एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात ठेवण्याबाबतचे जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवले आहेत. ही कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधिक्षक विजय कबाडे, उपअधिक्षक स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Leave a comment