बीड । वार्ताहर
जिल्हा प्रशासन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जीवाचे रान करत असुन सर्व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. याचाच एक महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग, जेष्ठ नागरिक, निराश्रीत आणि बेघर व्यक्तींसाठी सामाजिक न्याय विभागाने कंबर कसली आहे. या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांच्या नेतृत्वात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीस येणार्या अडचणी सोडवल्या जात आहेत. या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील 469 दिव्यांग, बेघर व जेष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोहच वितरण करण्यात आले. त्यामुळे या सर्व घटकांना मोठा आधार मिळाला आहे.
कोरोनावर प्रतिबंध मिळवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन सुरूअसुन याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होऊ नये म्हणुन प्रशासन जिकरिचे प्रयत्न करत आहे. यामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, बेघर व्यक्ती, भिक्षेकरी, निराधार व्यक्ती यांनाही त्रास होऊ नये म्हणुन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ सचिन मडावी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्यावरही जबाबदारी सोपवली आणि या दोन्ही कर्तव्य दक्ष अधिकार्यांनी ही जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली.सर्वात प्रथम या अधिकार्यांनी जिल्हास्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करून याचे नियंत्रण स्वतः डॉ.मडावी यांनी स्वतःकडे घेतले तर जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी जबाबदारी स्वीकारून जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक यांना तालुका समन्वयक म्हणुन नियुक्त केले आहे.
ही सर्व टीम जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, बेघर व्यक्ती यांना येणार्या अडचणी सोडवत आहेत.यामध्ये जिल्ह्यातील 168 मुकबधिर, 110 अस्थिव्यंग, 25 अंध तर 100 पेक्षा जास्त मतिमंद दिव्यांगांना मदतीचे वितरण करण्यात आले. याकामी डॉ. सचिन मडावी आणि राजू एडके हे दोन्ही अधिकारी थेट लाभार्थ्यांना भेटून अडचणी समजुन घेऊन त्या सोडवत आहेत. या अधिकार्यांनी सर्व प्रथम बीड शहरातील सर्व बेघर व्यक्तींना निवार्यात नेऊन ठेवुन त्यांची व्यवस्था केली इतकच नव्हे तर एका भिक्षेकर्यांचे वाढलेले केस आणि दाढी करण्यासाठी सलून दुकान बंद असल्याने डॉ. मडावी यांनी स्वतः साहित्य उपलब्ध केले आणि या भिक्षेकर्यांची संपूर्ण स्वच्छता केली.तर राजू एडके यांनी या बेघरांची राहण्याची व भोजणाची व्यवस्था केली.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे एक वृध्दाश्रम चालतो. या लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणचे खायचे साहित्य संपले होते. याची माहिती राजू एडके यांना मिळताच त्यांनी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वतः दिव्यांग असणारे संभाजी लांडे आणि बौधवर्धिणी मतिमंद विद्यालयाचे शिक्षक उद्धव कदम यांचे मदतीने या वृध्दाश्रम आवश्यक ते साहित्य पुरविले तर तालुका समन्वयक विजय शिंदे यांचे मदतीने एका अंध व्यक्तीस जीवनावश्यक वस्तु पुरविल्या केज येथील अपंग शाळेचे कर्मचारी हॅण्डीबाग हे आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन केज तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती ना आवश्यक असणारे सर्व साहित्य पुरवत आहेत. या सर्व टीममुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती,जेष्ठ नागरिक, बेघर व भिक्षेकरी यांना मदत मिळत आहे.याकामी मुख्याध्यापक फुलचंद लुचारे, दिलीप कुलकर्णी, अशोक चव्हाण, संभाजी लांडे, उध्दव कदम, थळपती, विनायक गडदे, काकासाहेब थोरवे, सामाजिक कार्यकर्ते हरी गिरी यांची मोठी मदत मिळत आहे.
Leave a comment