बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील लागण झालेल्या एका रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने गुरुवारी बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला. असे असतानाच शुक्रवारी (दि.24) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशनमधून 8 तर अंबाजोगाईच्या स्वारातीच्या आयसोलेशनमधून 2 अशा एकुण 10 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. सायंकाळी हे रिपोर्ट प्राप्त झाले. हे सर्व दहाही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
गुरुवारी कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा दहा जण आयसोलेशनमध्ये दाखल झाल्याने काळजी वाढली होती. गुरुवारी रात्रीतून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आठ तर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कक्षात दोघे जण दाखल झाले होते. एकूण दहा जणांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठविले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागासह बीड जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 180 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आष्टी तालुक्यात आढळलेला एकमेव कोरोनाग्रस्त रुग्णही आता बरा झाला असून तो कोरोनामुक्त झाल्याने समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान सध्या 37 जण होम क्वॉरंटाईनमध्ये तर 253 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर शुक्रवारी 11 जण विलगीकरण कक्षात दाखल झाले.
पाच दिवसात 28 हजार मजुर स्वृगही
राज्य शासनाने पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून शुक्रवारी पाचव्या दिवशी रात्रीपर्यंत एकुण 27 हजार 867 मजूर जिल्ह्यात दाखल झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगीतले. दरम्यान ऊसतोड मजुरांना जिल्ह्यात येताना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करत तिथे दोन वरिष्ठ अधिकार्यांसह कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
Leave a comment