दिल्ली : -
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि आरोग्य सेवा जसं की दवाखाने, मेडिकल हे वगळण्यात आलं आहे. आता केंद्र सरकारने आणखी थोडी सूट दिली आहे. ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सूट देण्यात आली आहे. तसंच पीठाच्या गिरण्या, ब्रेडचे कारखाने हे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे मोबाइल प्रीपेड रिचार्जची दुकानंही सुरु राहतील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्यांची दुकानंही सुरु राहतील. तसंच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरु राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.
३ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. जे हॉटस्पॉट किंवा करोना प्रतिबंधित क्षेत्र नाहीत तिथे २० एप्रिलपर्यंत काही गोष्टींना संमती दिली आहे. दरम्यान काही गोष्टींना आणखी सूट देण्यात आली आहे. त्यासंदर्भातलं पत्र हे राज्य सरकारांना २१ एप्रिललाच पाठवण्यात आलं आहे. आवश्यक वस्तूंची गरज लक्षात घेता ब्रेडचे कारखाने, डेअरी सुरु राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच उन्हाळा असल्याने पंख्यांची दुकानंही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकानं उघडण्याचीही संमती देण्यात आली आहे. असंही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं.
मधमाशी पालन, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्था, फळांची आयात निर्यात यांनाही संमती दिली आहे. लाखो भारतीय मर्चंट हे शिपिंग जहाजांवर काम करतात. लॉकडाउनमुळे त्यांना जहाजांवर कामसाठी जाता येत नाही किंवा काहीजण अडकून पडले आहेत. यामुळे नोकरी गमावू का? अशी भीती यांना आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने साइन इन आणि साइन ऑफ संदर्भातले निर्देश दिले आहेत. २१ एप्रिलच्या पत्रात यासंबंधीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Leave a comment