मजुरांना मारहाण करत वीटभट्टी
चालकाकडून दहा हजार उकळले
सारडगाव येथील घटना;एसपींची कारवाई
बीड । वार्ताहर
परळी तालुक्यातील सारडगाव येथील एका वीटभट्टीवर जाऊन तिथे काम करणार्या मजुरांना काठीने मारहाण करत वीटभट्टी चालकाकडून 10 हजारांची रक्कम बळजबरीने काढून घेणार्या चार पोलिसांना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी (दि.23) निलंबित केले आहे. या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
एस.बी.चिंदमवार, जी.ए.येरडलावार, एस.एन.एकुलवार, पी.एस.पांचाळ (सर्व नेमणूकपरळी ग्रामीण ठाणे) अशी निलंबित झालेल्या चार पोलिस शिपायांची नावे आहेत. वीटभट्टी चालक मधुकर भीमराव डोळे (70, रा। सारडगाव ता. परळी) यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांनी चारही पोलिसांची चौकशी लावली. तथ्य आढळून आल्यानंतर पोलीस अधिक्षकांकडे अहवाल पाठवण्यात आला.
मधुकर डोळे यांची जावई सुंदर भक्तराम आघाव, यांच्या मालकीच्या जागेत सारडगाव शिवारात गट नंबर 532 मध्ये विटभट्टी आहे. सध्या कोरोनामुळे विटभट्टी बंद आहे. विटभट्टीवर विटा तयार असून तयार विटा त्यांच्या स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी त्यांच्या मित्राच्या ट्रकमध्ये विटभट्टीवरील विटा भरुन घरी घेवून जाण्याचे काम चालु होते. दि.19 एप्रिलच्या पहाटे दोन ते अडीच वाजण्याचे सुमारास ग्रामीण ठाण्यातील चारही पोलीस सारडगाव शिवारातील विटभट्टीवर अनाधिकृतपणे गेले होते, तिथे त्यांनी डोळे यांच्यासह विटभट्टीवर काम करणार्या मजुरांना शिवीगाळ करुन तसेच दमदाटी करुन काठीने मारहाण केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, तुमची वीटभट्टी उध्वस्त करुन जप्त करु असे धमकावत वीस हजारांची मागणी करत वीटभट्टी चालक मधुकर डोळे यांच्या जवळील 10 हजार रुपये घेतले असा ठपका ठेवण्यात आला आहे.
हे भ्रष्टवर्तन पोलीस दलास अशोभनीय असुन पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल असे गैरवर्तन केलेले आहे.मुंबई पोलीस (शिस्त व अपिले) 1956 मधील नियम 3 ( 1- अ) ( अ) अन्वये व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नियम 25 (2) अन्वये तसेच गृह विभाग अधिसूचना क्रमांक एमआयएस/1910/प्रक्रा185/पोल-6 अन्वये चारही पोलिसांना आदेश मिळाल्यापासून प्राथमिक चौकशी-विभागीय चौकशीचे अधीन राहून अंतिम निर्णय लागेपर्यंत शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान एकाचवेळी एकाच ठाण्यातील चार कर्मचारी निलंबित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. चौघांनाही निलंबन काळात पोलीस मुख्यालयात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Leave a comment