बीड | वार्ताहर
राज्य शासनाच्या निर्णयानंतर ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वजिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात ऊसतोड कामगारांना प्रवेश देण्यासाठी वेगवेगळे 21 प्रवेश मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.त्यापैकी गुरुवारी जामखेड येथे कोरोनाची लागण झालेले 2 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजना म्हणून जामखेडकडून बीडमध्ये येणारे सर्व मार्ग (सर्व सिमा) सिलबंद करण्यात आले आहे.त्यामुळे आता या भागातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मजुरांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे की, जामखेड शहराव्यतिरिक्त खर्डा- अनपटवाडी असा येणारा रस्ता ऊसतोड कामगारांसाठी मेडिकल टिमसह बीड जिल्ह्यात येण्यासाठी सुरु राहील. या व्यतिरिक्त जामखेडकडून येणारे साकत, सौताडा ,डहाळेवाडी, कोल्हेवाडी हे रस्ते पुर्णपणे सिल करण्यात आले आहेत.
जामखेडकडून आष्टी ठाणे अंतर्गत प्रवेश करणारे तीन रस्ते असून पैकी ऊसतोड कामगारांसाठी फक्त खडकत मार्गाचा रस्ता सुरु राहील.चिंचपूर व अरणगांव हे रस्ते पुर्ण सिल बंद करण्यात आले आहेत.जामखेडच्या हद्दीला लागून असलेले बीड जिल्ह्यातील आष्टी ठाणे अंतर्गत येणारे मातकूळी,आष्टा,चिंचपूर,कर्हेवडगांव, गंधवाडी व मातोळी या गावांना कटेंन्मेंट झोन घोषित केले असून ही गावे पूर्णपणे सिल केली आहेत.
नगर जिल्ह्यातून कर्जत-मिरजगांव-वाकी आष्टीमार्ग बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना प्रवेश देणाऱ्या वाकी येथील चेकनाका पाईंटवर गर्दी न करता,सदर नाक्यासोबत खडकत व अनपटवारडी या पर्यायी मार्गाने ऊसतोड कामगारांनी बीड जिल्ह्यात प्रवेश करावा. हे सर्व बदल पोलीस अधीक्षक हर्ष.ए.पोद्दार यांच्या आदेशान्वये पोलीस प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आले आहेत.
Leave a comment