बीड । वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात परतत आहेत. त्या प्रत्येकांची जिल्ह्यातील 19 चेकपोस्टवर सर्व तपासणी करुन तसेच प्रत्येकाच्या हातावर 28 दिवसांसाठीच्या होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जात आहे. आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षक, पोलीस आदी कर्मचार्यांची टीम प्रत्येक चेकपोस्टवर कार्यरत आहे. बुधवारी (दि.22) सायंकाळी 6 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात 18 हजार 67 ऊसतोड कामगार दाखल झाले असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली.
कोरोनाच्या स्थितीमुळे देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील तब्बल 1 लाख 31 हजार ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातील कारखाना परिसरात अडकले आहेत. सर्व ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. बीड जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यात परतणार्या ऊसतोड मजुरांना सुविधा पुरवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 38 साखर कारखाना परिसरातून हे मजूर बीड जिल्ह्यात परतत आहेत. त्या सर्व ऊसतोड मजुरांची जिल्ह्यातील 19 चेकपोस्ट तपासणी करुन त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
दोन संशयित कोरोना चाचणीसाठी पाठवले
बीड जिल्हा सीमा प्रवेशाच्या चेकपोस्टवर अधिकृत नोंद झालेले 18 हजार ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले असून उदयगिरी शुगर्स बामणी जि. सांगली येथून परळीत आलेल्या 18 पैकी दोन व्यक्तींना ताप व घशात खवखव असे लक्षण आढळून आले. त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथे कोरोना चाचणीसाठी पाठवले असून उर्वरित व्यक्तींना परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
उर्वरित मजूर दोन दिवसात गावी पोचतील-धनंजय मुंडे
राज्यात विभागनिहाय पश्चिम महाराष्ट्र 1 लाख 24 हजार, नागपूर विभाग 5 हजार, तर मराठवाड्यात जवळपास दोन हजार असे एकूण 1 लाख 31 हजार ऊसतोड मजूर अडकलेले असून, काहीजण परतीच्या प्रवासात अडकलेले होते. त्यांपैकी आतापर्यंत 18,067 मजुर गावी परतले आहेत, त्यांना धान्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांमार्फत स्थानिक प्रशासनाला दिल्या असून, स्थानिक प्रशासनासह पालकमंत्री धनंजय मुंडे स्वतः व त्यांचे कार्यालय तसेच पदाधिकारी या बाबींवर लक्ष ठेऊन आहेत.उर्वरित सर्व ऊसतोड मजूर बांधव येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोहचतील अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. परतलेल्या ऊसतोड मजुरांना गावकरी व प्रशासनातील स्थानिक कर्मचार्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी. असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.(संग्रहित फोटो)
Leave a comment