लॉकडाऊनमध्ये बारा ठिकाणी
घरफोड्या झाल्याने भीती;बँकही फोडली
आष्टी । वार्ताहर
लॉकडाउनच्या काळातील बारा ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत विशेष म्हणजे यातील काही घरफोड्या भरदिवसा झाल्या आहेत.आष्टी पोलीस निरीक्षकांना मात्र अनेक ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन त्यांना पकडण्यात अपयश आले आहे. आता आष्टीवाशीयांचा पोलिसांवरचा विश्वास उडाल्याने अनेक गल्लीत नागरिकांनी जागते पहारे सुरू केले आहेत.
आष्टीत शिवनेरी अपार्मेन्ट,औदुंबर अपार्मेन्ट, जोगेश्वरी खानावळ, बबन माने यांचे निवासस्थान ,खडकत रोडवरील केरूळकर किराणा, धोंडे यांचे किराणा दुकान, निंबाळकर यांचे किराणा दुकान,अहिल्यादेवी गॅस एजन्सी, सुरज ट्रेडर्स यासह आष्टी शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत मात्र यातील एकाही चोरीचा तपास आष्टी पोलिसांना लावता आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण बीड जिल्ह्यात संचारबंदी लागु असतानाही चोरीच्या घटना मात्र सुरूच आहेत. आष्टी येथे संचारबंदी काळात अनेक दुकानाचे शटर उचकटून चोर्या झाल्या होत्या.आता आष्टी येथील बंधन बँकेच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडुन चोरट्यांनी डिव्हीआर मशिनसह काही रक्कम लंपास केली. चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी आष्टी पोलीसात तक्रार नोंदवली. आष्टी शहरात बंधन बँकेची शाखा आहे. दि.13 ते 21 एप्रिल या कालावधीत चोरट्यांनी बँकेच्या चॅनल गेटचा कोंडा तोडुन आत प्रवेश केला. आतील 3 हजार 360 रूपयांच्या रक्कमेसह सीसीटीव्ही स्टोरेजची डिव्हीआर मशिन असा एकुण 23 हजार 360 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरीचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक शितल तनपुरे यांनी आष्टी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याआधी भरदिवसा झालेल्या घरफोड्यांच्या तपासात शून्य प्रगती आहे.
अपयश झाकण्यासाठी आष्टी पोलिसांचा नवा फार्मूला
कुठलीही घटना घडल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर त्याची फिर्याद द्यायला गेल्यानंतर ठाणे अंमलदार हे तुम्ही तुमचा अर्ज लिहून द्या. साहेब बाहेर गेले आहेत ते आल्यानंतर कारवाई करू असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात फिर्यादीला उद्या बोलावतो ,परवा बोलवतो असे सांगुन त्या फिर्यादीची हेळसांड केली जाते. केवळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पोलीस ठाण्यात जास्त गुन्हे दिसू नयेत म्हणूनच याठिकाणी फिर्याद न घेता केवळ अर्जावरच त्या तक्रारदाराची बोळवण केली जाते. बीड जिल्ह्यात आष्टी पोलिस स्टेशनचा हा नवा फार्मूला तयार झाला असून निष्क्रीय पोलीस निरीक्षक असल्याचे जनतेत बोलले जात आहे.
Leave a comment