बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांच्या उपस्थितीत सर्व मुस्लिम धर्मगुरूंची बैठक घेण्यात आली. या बैठकीतील मागणीनुसार पवित्र रमजान महिन्यात मस्जिदमध्ये अजानसाठी ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वापराची रितसर परवानगी सर्व मस्जिद व्यवस्थापनाने पोलिस ठाण्याकडून मिळवावी असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने वेळोवेळी नमुद केलेल्या निर्देशाप्रमाणे ध्वनीक्षेपकाचा वापर केला जावा तसेच सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधी व्यतिरिक्त ध्वनीक्षेपकाचा वापर केल्याचे आढळून आल्यास सबंधीतावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. तसेच मस्जिदीचे मौलवी आणि मुअजम यांनाच अजान देता येईल या व्यतिरिक्त एकही व्यक्ती मस्जिदमध्ये नमाजसाठी जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच सकाळी 6 वाजेच्या अगोदर व रात्री 10 वाजेनंतर ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी अटी व नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
Leave a comment