बीड । वार्ताहर
ठाणे जिल्ह्यातून बीड तालुक्यातील जुजगव्हाण येथे आलेल्या कर्मचार्याला कोरोना झाल्याबाबतची चूकीची बातमी दैनिकाच्या लाईव्ह पोर्टलच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना बुधवारी (दि.22) सायंकाळी पिंपळनेर पोलीसांनी ताब्यात घेतले.
ढेकणमोह्याजवळील जुजगव्हाण येथील संशयित कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी दुचाकीवर गावात येवून गेल्याचे वृत्त या वेब पोर्टलवरुन प्रसारित केले गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात गावकर्यांनी पोलीसांकडेच विचारणा केली.त्यानंतर पिंपळनेर पोलीसांनी संपादक गमंत भंडारी यांच्या विरोधात कलम 505 (2) व कलम 188 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला. या वृत्तामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा उल्लेख केला गेला होता, मात्र जो कर्मचारी गावात येवून गेला त्याने ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात जावून स्व:तची तपासणी केली होती, त्यांना कोरोना तपासणीची गरज नसल्याचे डॉक्टरांनी प्रमाणपत्रही दिले होते. मात्र पार्श्वभूमीच्या लाईव्ह पोर्टलवरुन चूकीची माहिती देण्यात आल्यामुळे जुजगव्हाणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपळनेर पोलीसांनी याची दखल घेत पोहेकॉ. सानप यांच्या फिर्यादीवरुन संपादक गंमत भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करत बुधवारी सायंकाळी त्यांना अटक केली.सहाय्यक निरीक्षक शरद भूतेकर पुढील तपास करत आहेत.
Leave a comment