बीड । वार्ताहर
कोरोना संशयितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात (विलगीकरण कक्ष) आज बुधवारी (दि.22) सकाळी तीन रुग्ण दाखल झाले. त्या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सायंकाळी 4.30 वाजता हे तीन रिपोर्ट प्राप्त झाले, ते सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
जिल्ह्यात बीडसह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. आज पाठवलेले तीन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातुन पाठवलेले सर्व 167 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह ठरले आहेत.. यात बीड जिल्हा रुग्णालयात 125 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात 42 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे.
Leave a comment