चौसाळा । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले ऊसतोड कामगार लॉकडाऊन मुळे इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले होते. शासनाने त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजुर परतत आहेत. मंगळवारी दुपारी बीड तालुक्यातील चौसाळा येथील चेकपोस्टवर जाऊन प्रशासनासह सद्यस्थितीचा आढावा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी भेट देऊन घेतला.उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांसोबत चर्चा करत येणार्या कामगारांची आस्थेवाईक चौकशी करा, तपासणी करा आणि त्यांना सन्मानाने आपआपल्या गावी जाण्यासाठी मदत करा, असं म्हणत आ. क्षीरसागरांनी ऊसतोड कामगारांना आधार दिला.
गेल्या दोन दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या परतीला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे ऊसतोड कामगारांना आपआपल्या घरी जाता येत नव्हते. शासनाने जिल्ह्याच्या सीमांवर ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासणीचा निर्णय घेऊन त्यांना घरापर्यंत जाण्यास मुभा दिली. चौसाळ्याजवळील चेक नाक्यावर मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर आज आले होते. आ. संदीप क्षीरसागरांनी त्याठिकाणी जाऊन ऊसतोड कामगारांशी चर्चा केली, त्यांच्या अडीअडचणी विचारल्या.बीड तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेर जाणार्या कामगारांशी आस्थेवाईक बोलून काही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असंही संदीप यांनी कामगारांशी बोलताना सांगितलं.
Leave a comment