गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना शासनाने रेशन दुकानदारांना मोफत तांदुळाचे वाटप करण्याचे आदेश दिले होते. आमदार लक्ष्मण पवार यांनी ही संबंधितांना भावनिक आवाहन करून, गरिबांचे राशन इमानेइतबारे वाटप करण्याची सूचना केली होती. मात्र, या आवाहनाला प्रतिसाद देऊन, काहींनी ऐकले तर काहीनी दहाच्या जागी पाच अन् पाचाचे दोन, अशी शक्कल लढवून, तांदुळ वाटपात पाप केल्याच्या तक्रारी आमदार लक्ष्मण पवार यांच्या मोबाईल आल्याने, मंगळवारी (दि.21)सकाळी साडे अकरा वाजता तहसिल कार्यालयात बैठक घेऊन अधिकारी, कर्मचार्यांसह दुकानदारांची झाडाझडती घेतली.
आ.पवार यांनी तहसील कार्यालयात दि.21 रोजी पुरवठा विभागाच्या बैठक घेतली. यावेळी तहसीलदार धोंडिबा गायकवाड, पुरवठा अधिकारी ना.त.अशोक भंडारे, माजी उपनगराध्य दादासाहेब गिरी, प्रा.संजय आंधळे, प्रा.येळापुरे, सचिन वावरे यांच्यासह तलाठी, मंडळाधिकारी, पत्रकार आदींची उपस्थिती होती.आ.पवार म्हणाले, देकोरोना सारख्या महामारीचे संकट असताना शासनाकडून मोफत आलेल्या माल वाटपात अनेक दुकानदार अफरातफर करत असून याबाबतच्या अनेक तक्रारी मोबाईलवरून माझ्याकडे येत असून याबाबत मी संबंधित अधिकार्यांना याची माहिती देऊन थेट गावात जाऊन चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. मात्र काही अधिकारी खोटे अहवाल देऊन दुकानदारांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. मी स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांकडे चौकशी करणार आहे. यामध्ये दुकानदारांना पाठीशी घालणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरच कारवाई करणार असल्याचे सांगत आ.लक्ष्मण पवार अधिकारी व कर्मचार्यांना चांगलेच खडसावले.
आमदार पवार यांनी मोबाईल नंबर देऊन, तक्रारी करा असे आवाहन केले होते. या काळात त्यांना मोबाईलवरून आलेल्या तक्रारीबाबत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला असता, पोहीतांडा या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला असून, बागपिंपळगाव व अर्धपिंप्री या दोन दुकाना निलंबित करण्यात आल्या असून महांडुळा, सेलू, कोलतेवाडी, भेंड टाकळी, बंगाली पिंपळा, लोणाळा, खेर्डावाडी, नांदलगाव, साठेवाडी यासह आदी गावच्या दुकाना या चौकशीवर असल्याचे ना.त. अशोक भंडारे यांनी सांगितले. उर्वरित दुकानांची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करा तसेच याबाबत तपासणी करणार्या अधिकार्यांनी दुकांदाराशी संगनमत करून चुकीचा अहवाल सादर केल्यास मी स्वतः गावात गावात जाऊन लाभार्थ्यांकडे चौकशी करणार असून, कुठलाही अधिकारी अथवा कर्मचारी दोषी आढळून आल्यास दुकानदाराच्या आधी संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्यास भाग पाडू असेही आ.पवार यांनी या बैठकीत ठणकावून सांगितले.
Leave a comment