बीड । वार्ताहर
राज्यातील समग्र शिक्षा राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय 15 संवर्गातील कँत्राटी कर्मचार्यांच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संकटसमयी मदत म्हणून 18 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केल्याची माहिती करार कर्मचारी संघटनेच्या राज्य पदाधिकार्यांनी दिली. यामध्ये समग्र शिक्षा जिल्हा परिषद, बीड अतंर्गत कर्मचार्यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. जिल्हयातील 190 कर्मचार्यांनी सुमारे पावणेदोन लाख रूपयाचा निधी राज्य कार्यालयाकडे दिला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश या महामारीच्या संकटात सापडला आहे. कोरोनाचे हे संकट एका राष्ट्रावरच नव्हे तर जगभरातील सर्वच देशावर हे संकट कोसळले आहे. संपूर्ण देशभर लॉकडाऊन घोषित केले आहे. यामुळे गोर-गरीब, मोल-मजुर, कामगारांच्या मजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट अनिश्चित काळासाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनानुसार राष्ट्रसेवा म्हणून देशावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि संकटसमयी मदतीचा हात म्हणून सेवा ही भावना निर्माण झाली आहे. संकट काळातील राष्टसेवा म्हणून केवळ 10 दिवसात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अतंर्गत समग्र शिक्षाच्या राज्यस्तरीय आणि जिल्हयातील 15 संवर्गातील कँत्राटी कर्मचार्यांनी स्व:इच्छेने 18 लाख रूपयाचा निधी जमा केला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाचे सहसंचालक राजेंद्र पवार यांना सोबत घेवून सदर निधीचा धनाकर्ष मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे. सदर धनादेश मुख्यमंत्री महोदयांच्या प्रधान सचिवाकडे दिनांक 16 एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात आला. यावेळी सहसंचालक राजेंद्र पवार यांच्यासह करार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या आपद्कालीन सेवेसाठी सहभागी झालेल्या आणि मदतनिधी दिलेल्या सर्व कँत्राटी कर्मचार्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
Leave a comment