अंबाजोगाई । वार्ताहर
परळी विभागातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये गुरूवार,दि.23 एप्रिल पासून पुन्हा
कापूस खरेदी सुरू करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी,संचालक भारत चामले यांनी दिली आहे.
आतापर्यंत परळी विभागात सुमारे 15 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून बहुतेक सर्व शेतकर्यांचे कापूस खरेदीचे पैसे अदा करण्यात आले आहेत.ज्या शेतकर्यांच्या बँक खात्यात अनियमितता आढळली केवळ त्यांचेच पैसे राहिले आहेत.परळी विभागातील शेतकर्यांकडे सुमारे 3 ते 4 लाख क्विंटल एवढा कापूस शिल्लक असू शकतो. शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे व प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे,पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी हे प्रयत्नशील राहिले.त्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सोमवार,दि.20 एप्रिल रोजी बीड येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीत राज्याचे उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके,जिल्हा सहकार निबंधक बडे साहेब व पणन महासंघाचे अधिकारी उपस्थित होते.त्यानुसार सोशल डिस्टन्स पाळून,मास्कचा वापर करून पूर्वीच्याच खरेदी केंद्रांवर पणन महासंघाच्या देखरेखीखाली कापूस खरेदी करण्यात येईल.एका दिवशी एका जिनिंगवर फक्त 20 वाहने यांनाच अनुमती दिली आहे. अनुमतीप्रमाणे 23 एप्रिल 2020 पासून सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कापूस खरेदी केली जाईल अशी माहिती पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके,माजी उपाध्यक्ष तथा संचालक राजकिशोर मोदी,संचालक भारत चामले यांनी दिली आहे.
Leave a comment