आष्टी । वार्ताहर
कुठलीही निवडणूक नसताना समोरच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता,कोणताही गवगवा प्रसिद्धीची हाव न करता कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे व्यवसाय, रोजीरोटी गमावलेल्या ‘असहाय्य’ कुटुंबांना शोधून नावे कळवा,आणि मदत मिळवा असे आवाहन करणारे खरे म्हणजे आजच्या काळातील वेडेच ठरावेत, परंतु आष्टी सारख्या संतांच्या आणि सुसंस्कृत भूमीमध्ये असेही कोरोना वॉरीअर्स पडद्यामागे राहून आपली समाज प्रति असलेल्या ऋणांची उतराई करताना दिसत आहेत.
कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे उद्योगधंदे बंद आहेत. त्यामधील कामगार, हातावरील पोट असलेले खडी फोडणारे मजूर असोत, वा दूरदेशाहून आलेले इतर राज्यातील आयुर्वेदिक जडीबुटी विक्रेते असोत. हे सर्व आज अन्नाला महाग झाले आहेत. ही मंडळी थोड्याफार ओळख असलेल्या स्थानिक नागरिकांकडे आपली व्यथा सांगत आहेत आणि हे नागरिक आष्टी शहरातील आशा गोसावी, प्रफुल्ल गोसावी, संतोष दाणी, डोईठाण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.युवराज तरटे यांना कळवतात आणि ही मंडळी या भुकेल्या कुटूंबियांना अन्नधान्य किराणा आणि भाजीपाला तेही किमान महिनाभर पुरेल इतका त्यांच्या घरी पोहोच करत आहेत.
नायब तहसीलदार शारदा दळवी यांना हिवरा परिसरात राहणार्या जडीबुटीवाले बबलूसिंग यांनी कळवले की, आमची गेल्या महिनाभराची अन्नधान्याची तरतूद हिवरा गावातील नागरिकांनी केली होती परंतु आज संध्याकाळी खाण्यासाठी काहीही शिल्लक नाही त्यावर त्यांनी स्वतः पाहणी करून त्यांचे हालहवाल पाहिले लगेचच त्यांनी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, डॉ.युवराज तरटे, संतोष दाणी सर आणि आशा आणि प्रफुल्ल गोसावी यांना परिस्थिती सांगितली आणि लगेच दुपारपूर्वी या 45 व्यक्तींचा कुटुंबांना गहू,बाजरी, भाजीपाला आणि किराणा साहित्य किमान एक महिनाभर पुरेल एवढे साहित्य पोहोच केले यावेळी हिवरा येथील उपसरपंच रतनबाई लगड यांचे चिरंजीव अंबादास लगड, शिवलिंग लगड,अशोक लगड, अजिनाथ लगड, सोसायटीचे चेअरमन मुरलीधर लगड, भाऊसाहेब चव्हाण, मच्छिंद्र वाळके आदी उपस्थित होते.या सर्वांची त्यांना मदत होत आहे.हिवरा येथून परत येताना खकाळवाडी परिसरातील हॉटेलमधील कामगार असलेल्या गोसावी कुटुंबांला व वटणवाडी येथील बाळू शिरोळे या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या सर्व कुटुंबियांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले . ते केवळ या निरपेक्ष,सह्रदयी,दातृत्व असलेल्या कोरोना महामारी विरुद्ध समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून लढणार्या या खर्या कोरोना वॉरिअर्समुळेच. या सर्वांची आणखीही गरजू कुटुंबांना मदत करण्याची तयारी आहे.या दात्यांना दादा तरटे,कल्याण वाल्हेकर, प्रशांत बन हे मदत करत आहेत. आशा आणि प्रफुल्ल गोसावी यांनी आष्टी विभागातील सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना सॅनिटायजर व एन 95 हे दर्जेदार मास्क पुरवले आहेत.कुठलीही प्रसिद्धी आणि गवगवा न करता हे त्यांचे दातृत्वाचे कार्य चालू आहे.
Leave a comment